कारंजा : साधारणतः मानवी स्वभाव हा यशस्वी भविष्यवाणीने आनंदीत होऊन मानसिक समाधान मिळविणारा राहीलेला आहे.मग त्याला जगाचा पोशींदा शेतकरी तरी कसा अपवाद राहणार ? ऊन, पाऊस थंडी असो किंवा भर दुपार वा रात्री बेरात्रीची वेळ असो. जंगली श्वापदांची भीती असो की,पैशाची अडचण किंवा कर्जाचा डोंगर असो,सर्व संकटाशी दोन हाथ करीत, शेतकरी माती मध्ये जवळची पूंजी उधळून,आपल्या शेतजमीनीमध्ये मशागत व पेरणी करून चांगल्या पिकांची प्रतिक्षा करीत असतो.परंतु गेल्या अनेक वर्षानुवर्षे बळीराजाला कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा मुकाबला करावा लागत असल्याचे वास्तव असून, केव्हा कोरडा दुष्काळ तर केव्हा ओल्या दुष्काळाला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत असल्याने, त्याचा जीव टांगणीला लागलेला आहे.आपण लक्षात घेतले तर कळेल की,महाराष्ट्रातील शेतकरी हा पूर्णतः राज्याच्या हवामान विभागाच्या अंदाजावर अवलंबून असून,मिळालेल्या हवामान अंदाजा वरून त्याच्या शेतीच्या कामाचे नियोजन करीत असतो. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यातील ग्राम रुई गोस्ता येथील शेतकरी पुत्र गोपाल विश्वनाथ गावंडे हे हवामानाचा अचूक अंदाज देणारे,हवामान अभ्यासक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी मित्र,समाजसेवी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे हे हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या हवामानाच्या अंदाजांना आपल्या वृत्तपत्रामधून ठळकपणे प्रसिद्धी देवून,ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना उचित मार्गदर्शन करीत असतात.यावर्षी संजय कडोळे यांनी गोपाल गावंडे यांचे अंदाजावरूनच, चांगल्या पावसाचे संकेत दिले होते. "यंदाचे पाऊसमान चांगले राहून,पिकांची परिस्थिती सुद्धा उत्तम राहणार असून,शेतकरी राजाला भरघोस उत्पन्न होणार आहे." असे त्यांनी वेळोवेळी आपल्या बातम्या मधून भविष्य वर्तवलेले होते." त्यांच्या अंदाजावर विसंबून असलेल्या शेलूवाडा येथील शेतकरी रामदास कांबळे यांचा पूर्ण विश्वास होता. व त्यानुसार त्यांनी नियोजन केले होते.चालू वर्षी संजय कडोळे यांच्या बातम्यानुसार,प्रत्येक आठवड्यात पिकाला पूरक ठरणारा पाऊस होत असल्याने, शेतातील पिकाची स्थिती फारच सर्वोत्तम असून, शेतातील सोयाबीन,तूर,कापूस,मुग,उडीद पिके चांगलीच वाढलेली असून, बहरत आहेत.त्यामुळे शुक्रवार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी, शेतकरी रामदास कांबळे व गजानन चव्हाण यांनी संजय कडोळे यांना शेतात बोलावून आपली पिके दाखवली.व संजय कडोळे यांचे पाय आपल्या शेतजमिनीला लागल्याबद्दल अक्षरशः सुखद अशा आनंदाश्रूंनी त्यांचे स्वागत करीत आभार मानले.व यंदा आपल्या भविष्यवाणीमुळे आम्हाला भरघोस उत्पन्न होऊन कर्जमुक्त होण्याला मदत होणार असल्याचे आनंदाने सांगितले.त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनाही "आपल्यावरील शेतकऱ्याच्या विश्वासामुळे भावनाप्रधान झाल्याचे वाटले.दिलासा देतांना ते म्हणाले,यंदा प्रत्यक्ष निसर्गराजा प्रसन्न असल्याने त्यांच्या कृपेवरून पावसाचा वर्षाव सुरू आहे.त्यामुळे सर्व श्रेय निसर्गाला आणि शेतकऱ्याच्या विश्वासाला व अजोड मेहनतीला असल्याचे खुल्या दिलाने स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतात बोलवून,सर्व पिकाची पाहणी करून पुढील मार्गदर्शन मागीतल्याबद्दल आभार मानले.