अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर निरंतर राबित आहेत .
दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी तिक्ष्णगत आय एम ए च्या वॉकेथॉन स्पर्धेत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे यशस्वी सहभाग नोंदवण्यात आला.
दिव्यांगांसाठी ३ किमी चालण्याच्या स्पर्धेत दिव्यांग सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग सदस्य निलेश लोडम, वसुधा पंडित, अमित सोळंके, कुणाल यादव, अस्मिता मिश्रा व हरिभाऊ कोल्हे यांनी यशस्वी सहभाग नोंदवून परीक्षक व जनसामान्याचे लक्ष वेधून घेतले . सर्व सामान्य पेक्षा आम्ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही याचा प्रत्यय दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या दिव्यांग धावपटूंनी सर्वांना करून दिला . आय एम अकोला चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सोनवणे तिक्ष्णगत फाउंडेशन चे डॉ.सुगत वाघमारे व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीश भट यांनी डॉ.विशाल कोरडे व संस्थेच्या दिव्यांग धावपटूंचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन जाहीर सत्कार केला . गेल्या ४ महिन्यापासून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या प्रशिक्षकांकडून सदर धावपटूंना चालण्याचे, प्राणायाम व योग प्रशिक्षण देण्यात आले होते .
सदर क्रीडापटूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना नागपूर येथील डॉ. अरुणा गौतम सिंगी व अंगद गौतम सिंगी यांनी मानधन देऊन प्रशिक्षकांचा सन्मान केला होता . वसंत देसाई स्टेडियम ते टॉवर चौक दरम्यान संपन्न झालेल्या या वॉकेथॉन मध्ये दिव्यांग बांधवांना स्वयंसेवक म्हणून गणेश सोळंके, रूपाली सावजी, अरुणा सोळंके, मोना उमाळे व बिनू पंडित यांनी कार्य केले . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या या क्रीडा सहभागा विषयी अकोल्यातील मान्यवर व क्रीडा विभागातील सर्व प्रशिक्षक भरभरून कौतुक करीत आहेत .