गडचिरोली (Gadchiroli), २१ सप्टेंबर : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असून यश येतांना दिसत आहे. नुकतेच आज २१ सप्टेंबर रोजी दोन जहाल नक्षलींनी गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित नक्षली मध्ये एका महिला नक्षली व एका पुरुष नक्षलीचा सहभाग आहे. अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर, (२६) रा. तिम्मा जवेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो (३०) रा. डांडीमरका पोस्टे आरेच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) असे आत्मसमर्पित नक्षलीचे नावे आहेत. त्यांच्यावर ६ लाख रुपयांचे शासनामार्फत बक्षिस जाहीर होते.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.