प्रथम आपण भक्ती म्हणजे काय? यावर विचार करु या. नोकरी, विवाह व्हावासा वाटत असेल तर अशा व्यावहारिक गरजा करिता धार्मिक पूजा, पोथी या विधीचे अवडंबर माजवून भक्तगण रोजच्या रोज देवाचे मागे लागत असतात. अशा नवसांनी देव मिळत नाही व तो प्रसन्नही होत नाही. आपण सकाम भक्ती न करता निष्काम भक्ती करावी. संतांनी सुद्धा निष्काम भक्ती केली. जेव्हा मनुष्य निष्काम भक्ती करतो तेव्हा त्याचे मन ईश्वराकडे एकरुप होते.
सांगा मी काय करु ।
भक्ती करु का पोट भरु ।।धृ.।।
काय करायचे, काय नाही करायचे याचा विचार करण्यापेक्षा भक्ती करणे गरजेचे आहे. भक्ती करायला वेळ दिला म्हणजे पोट भरत नाही असे तुम्ही का म्हणता. खाण्यासाठी जगू नये तर जगण्यासाठी खावे. पोट भरणे हा जेवणाचा हेतू नाही तर शरीर कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे हा त्या मागचा हेतू आहे. पोट भरण्यासाठी पशुपक्षी जिवंत राहण्यासाठी जगतात. मानवाला हे स्विकार होत नाही कारण मानव निरंतर सुखासाठी जगतो. मानव पोट भरण्यासाठी परिवाराला सोडून बाहेर जात असेल तर ते पशूचे आचरण झाले.
भक्ती म्हणते चाल पुढे ।
संसार म्हणते ये ईकडे ।
हे करु का ते करु ।।१।।
आपणांस हा मानवा देह ईश्वराने भक्ती करण्याकरिता दिला आहे. संसारामुळे तुम्हाला भक्ती करायला वेळ मिळत नाही. भक्ती करु का संसार करु अशी स्थिती होत आहे. संसारामधून वेळ काढून त्या ईश्वराची भक्ती करावी. राष्ट्रसंत म्हणतात की, "कामात लक्ष, रामावरी ठेव अंतरीचे" उदाः- लहान मुली खेळभांडे खेळताना सडा-सारवण, स्नान, स्वयंपाक करुन जेवणाची नक्कल करत ढेकरही देतात. पण पोट भरत नाही. ते सर्व मनाने करतात. परमेश्वर प्राप्तीकरिता पराभक्तीची आवश्यकता आहे.
भक्ती विणा देव दिसत नाही ।
पैसा विणा संसार चालत नाही ।
कोणता मी मार्ग धरु ।।२।।
भक्ती केल्याशिवाय देव मिळत नाही तसेच कामधंदा, नोकरी करुन पैसा कमाविल्याशिवाय संसार चालतच नसतो. संसार करुन, पैसा कमावून भक्ती करावी. राष्ट्रसंत म्हणतात की, "भक्तीविणा उद्धार नाही कुणाचा । भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा ।।" देवाचे कार्य म्हणजेच देवाची भक्ती होय. आपण जेवढे डोळ्यांनी पाहतो, ते सर्व भगवंताचीच रुपे आहे. या दृढभावाने जीवमात्राला परमात्मा समजून सर्वांची सेवा करणे हीच खरी भक्ती होय. संसार दुःख मुळ आहे म्हणून याचा विसर पडण्यासाठी भक्ती करावी लागते.
भक्ती करून जो पोट भरे ।
तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे ।
वेड्या मानवा नको घाबरु ।।३।।
ईश्वराची भक्ती करायला वेळ देऊन कामे करून, पैसा कमावून पोट भरु शकते. आपल्या मनात देवाविषयी भाव नाही तर देव कसा भेटेल. देव काही बाजारचा भाजीपाला नाही असे राष्ट्रसंत म्हणतात. ईश्वराचे नामस्मरण जर केले तर खरोखरच त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अरे वेड्या माणसा भक्तीसाठी का घाबरतोस? ईश्वर नामस्मरण तर जरुरी आहे. संसारातील आपल्या जीवासारखे महत्त्व दुसऱ्याचेही जीवाला देऊन सर्वांचे सुखदुःखात आपुलकीच्या भावनेने सहभागी होऊन वागणे हीच खरी भक्ती समजावी.
उदाः- एक बेवारस कुत्र्याचे पायामध्ये काटा रुतला. तो लंगडत लंगडत देवपूजा करणाऱ्या साधूजवळ आला. त्या साधूला असे वाटले की, मी तर पूजा करीत आहे. कुत्र्याला हात लावू कसा. मला परत स्नान करुन पूजा करावी लागेल. त्या साधूने सुद्धा कुत्र्याची मदत केली नाही. तो कुत्रा एका तिर्थयात्रा करणाऱ्या साधूकडे गेला पण तो त्याला हात कसे लावू म्हणाला. त्या तिर्थयात्रा करणाऱ्या साधूने कुत्र्याला हाकलून दिले. तो कुत्रा एका ज्ञानेश्वरी वाचकाजवळ गेला व त्याचे जवळ ऊभा राहिला. त्या त्या ज्ञानेश्वरी वाचकाचा जीव दुखावला. त्याने कुत्र्याला कुरवाळले व पायातील काटा काढला. बिबा गरम करुन एक थेंब पायाच्या जखमेवर लावला. हीच तर खरी भक्ती आहे. दुसऱ्या जीवात देव पाहणे. राष्ट्रसंत म्हणतात, आपले मन सदा बाहेर भटकत राहते. ही काही खरी भक्ती नाही.
ही का भक्ती खरी?
पळते मन बाहेरी बाहेरी ।।
जेव्हा भक्ती अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. भक्ती जर भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तिर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा म्हणतात. भक्ती संगीतात शिरली तर तिला भजन, कीर्तन म्हणतात. भक्ती प्रकटते तेव्हा माणुसकी निर्माण होते आणि हीच भक्ती घरात शिरली तर घराचे मंदिर होते. भक्ती मनाच्या गाभाऱ्यात शिरली तर त्याला ध्यान म्हणतात आणि कृतीत उतरली तर सेवा असे म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की,
हरिनाम जपा मन लावूनिया ।
मग मोक्ष सुखा किती वेळ असे ।।
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....