वाशिम - महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता मधील प्रकरण तीन मध्ये नमूद सर्वसाधारण वित्तीय तत्वाचे पालन न करता सदर नियमाचा भंग केल्याबाबत ग्रामविकास विभागाचे ४ जानेवारी २०१९ चे परिपत्रक, ग्रामविकास विभागाचे शुध्दीपत्रक व प्राप्त चौकशी अहवाल, लोकायुक्तांचा निकाल आणि जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार मौजे पिंप्री अवगण येथील तत्कालीन सरपंच आणि सचिवावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दिलीप महादेवराव अवगण यांनी ९ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन दिले. तसेच कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशाराही अवगण यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पिंप्री अवगण येथील ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी केलेल्या भ्र्रष्ट्राचाराबाबत लोकायुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन लोकायुक्तांनी २२ जून २०२३ रोजी घेतलेल्या अंतीम सुनावणीतील दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र लोकायुक्तांनी दिलेल्या निकालाला सहा महिने उलटुनही दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. १४ जून २०२३ रोजी मंगरुळपीर पंंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या अहवालामध्ये ग्रामसेवक व तत्कालीन सरपंच आदींनी सन २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता मधील प्रकरण तीन मध्ये नमूद सर्वसाधारण वित्तीय तत्वाचे पालन न करता सदर नियमाचा भंग केला असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार १६ जुन २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गटविकास अधिकारी मंगरुळपीर यांना दिलेल्या पत्राव्दारे सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही गटविकास अधिकार्यांनी वरिष्ठांच्या निर्देशाचे पालन केले नाही. त्यामुळे येत्या २५ जानेवारीपर्यत दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्यात येईल व याची जबाबदारी पंचायत विभागाचे प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्यावर राहील असे अवगण यांनी जि.प.ला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.