यवतमाळ-वाशिम : स्थानिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. संजय देशमुख साहेब यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांसाठी विविध मागण्या मांडल्या.
यामध्ये कामरगाव-सोमठाणा महामार्गाची दुरुस्ती, दिग्रस बायपास मार्गाला निधी मंजुरी, यवतमाळ शहरासाठी ओवरब्रिज प्रकल्प, तसेच CRF अंतर्गत प्रमुख रस्त्यांसाठी विशेष निधी मंजुरी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यातील काही महत्त्वाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे.
कामरगाव ते सोमठाणा मार्गाला CRF अंतर्गत मिळणार मंजुरी.
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव-लाडेगाव-पिंप्रिमोडक-भामदेवी-धोत्रा देशमुख-वाढोना-दोनद-मनभा-उंबर्डा-सोमठाणा हा MDR 26 महामार्ग अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठी प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, विशेषतः शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी यांचा मोठा प्रवास याच मार्गावरून होतो.रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. हा मार्ग सुधारला तर शेतमाल, दूध, कृषी उत्पादने आणि व्यापारी वस्तूंच्या वाहतुकीस वेग येईल. याची गंभीर दखल घेत खासदार संजय देशमुख यांनी गडकरी साहेबांकडे हा विषय मांडला. गडकरी साहेबांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
दिग्रस शहर वाहतूक कोंडीपासून होणार कायम मुक्त
दिग्रस शहर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उद्घावत आहे. पुसद ते आर्णी या मार्गावरती NH 161A यामार्गाला दिग्रस शहरात वाहनांची प्रचंड वर्दळ असते. दिग्रसच्या मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या समस्येवर उपाय म्हणून इसापूर-देऊरवाडी या भूसंपादन झालेल्या बायपास मार्गासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. गडकरी साहेबांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी मंजूर करून या बायपासचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
बायपास झाल्यास दिग्रस शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल. स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिकांना दिलासा मिळेल.शहराच्या वाहतुकीचा वेग वाढेल आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल.
यवतमाळ शहरात ओवरब्रिजसाठी मागणी!
यवतमाळ शहरातील आर्णी आणि दारव्हा दिशेने येणाऱ्या वाहतुकीमुळे चिंतामणी पेट्रोल पंप ते पांढरकवडा स्मशानभूमी दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला मोठा अडथळा येतो. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी ओवरब्रिजच्या प्रस्तावासंदर्भात पत्र देण्यात आले.
गडकरी साहेबांनी यासंदर्भात तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून लवकरात लवकर हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल. ओवरब्रिज झाल्यास वाहतुकीची गती वाढेल आणि नागरिकांना जलद व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल.
CRF अंतर्गत प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर होणार!
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांना या खराब रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यासाठी CRF (केंद्रीय रस्ते निधी) अंतर्गत महत्त्वाचे रस्ते सुधारण्याची गरज आहे.
खासदार संजय देशमुख साहेबांनी यासाठी गडकरी साहेबांना निवेदन दिले असून, या प्रस्तावांना लवकरच मंजुरी देऊन आवश्यक निधी मंजूर केला जाईल.
आपल्या प्रतिक्रिया द्या....