ॲड.किरणराव सरनाईक हे नाव मागील जवळजवळ पाच वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात आहे. त्याला कारणही तसेच आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भक्कम अनुभव असताना सेवा भावनेतून शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याचे कंकण हातामध्ये बांधून एका वेगळ्या उर्मीने मैदानात उतरलेल्या या अनोख्या शिलेदारावरती शिक्षक बांधवांनी व भगिनींनी प्रचंड विश्वास दर्शविला आणि उदय झाला एका नव्या शिक्षक आमदार प्रतिनिधींचा. सोज्वळ सालस अत्यंत नम्रवृत्तीने प्रत्येकाला आपलंस करत हा विजय त्यांनी खेचून आणला होता. विजयश्री नंतर खरी परीक्षा होती.वर्तमान शैक्षणिक काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अनेक समस्या उभ्या राहत आहेत.एक समस्या सोडवत असताना त्या जागी तिला अनुसरून दुसरी समस्या उभी होत आहे.हा सगळा समस्यांचा पहाड पेलून शासन आणि शिक्षक यांच्यात समन्वय घडून आणण्याचे एक मोठे दिव्य कार्य यशस्वी व सक्षमपणे सांभाळणारे नेतृत्व म्हणून ॲड.किरणराव मालतीबाई आप्पासाहेब सरनाईक यांनी आपली ओळख प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचविली आहे.
अनेक दिवस शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम करून तांत्रिक अडचणीमध्ये पगाराविना अडकलेल्या शिक्षक बंधूभगिनींना त्यांच्या हक्काच्या पगाराचा वाढीव टप्पा मिळविण्यासाठीचा लढा अनेक मावळ्यांनी लढला.त्या मावळ्यांच्या लढ्यामध्ये त्यांना वाढीव टप्पा मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा ॲड सरनाईक साहेबांनी उचलला. जेव्हा कष्टाच्या नोकरीला हक्काचा पगार हातामध्ये पडला त्या मावळ्याच्या मनातील प्रत्येक स्पंदन सरनाईक साहेबांना आदरपूर्वक धन्यवाद देत होते.अनुदानित, टप्पा अनुदानित, विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित,उच्च शिक्षण,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या ग्रंथपालांच्या समस्याआणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजना संदर्भातील समस्या,संस्था चालकांच्या समस्या,आयटीआय, कृषी क्षेत्र शिक्षण,इंजिनिअरिंग कॉलेज,कॉन्व्हेंट या सर्व स्तरातील समस्यांचा अभ्यास करून त्या सर्व समस्यांना असता पूर्वक वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम ॲड सरनाईकांनी अतिशय जबाबदारीने पार पाडलेले आहे.स्थानिक लेव्हल पासून ते विधान परिषदेपर्यंत आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून शैक्षणिक क्षेत्राला न्याय मिळवून देऊन ती समस्या पुन्हा कशी निर्माण होणार नाही हा त्यांचा प्रयत्न आहे. शिक्षण क्षेत्रात काम करताना त्या समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांचा अभ्यास करून त्या समस्यांचा निपटारा करण्याची कला त्यांना साधलेली आहे.त्यांच्याकडे आपली अडचण घेऊन गेलेला कोणताही व्यक्ती असो त्याचे अतिशय हसतमुखाने स्वागत करून त्याची समस्या समजावून घेऊन जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत न बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲड.सरनाईक आहेत. पाच जिल्ह्यातील 56 तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे नेतृत्व करताना अतिविशाल कार्यक्षेत्र असल्यामुळे दमछाक होणे साहजिकच आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून या क्षेत्राला न्याय देत असताना त्यांची सर्वांसोबत असणारी अतिशय नम्रतापूर्वक वागणूक अदबीने बोलण्याची कला या सर्व बाबी ते एक आगळेवेगळे प्रतिनिधी असल्याची साक्ष देतात.त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्यातील निकष पात्र असणाऱ्या सर्व शाळांना शालोपयोगी साहित्याचा लाभ मिळालेला आहे. या मोठ्या संख्येने असणाऱ्या शाळेपर्यंत पोहोचणारे आतापर्यंतच्या इतिहासातील आमदार ॲड.सरनाईक हे पहिले शिक्षक आमदार आहेत याबाबत त्यांचे दिलखुलासपणे कौतुक केले जाते.निवडणूक लढताना व जिंकताना असणारे सूक्ष्म नियोजन या क्षेत्रामध्ये काम करताना आजही दमदारपणे त्यांच्या समवेत काम करत आहे. व्यक्तिगत रित्या प्रत्येक शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याची प्रामाणिक तळमळ हीच त्यांच्या कार्याची खरी किमया आहे.प्रत्येक जिल्ह्याला जाऊन शिक्षकांना आवाहन करून शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये सभा आयोजित करून त्याच ठिकाणी समस्यांचा निपटारा करण्याचा आगळावेगळा पायंडा त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये पाडलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करताना शिक्षण क्षेत्रामधील सर्वच घटकांशी अतिशय जिव्हाळ्याचे सलोख्याचे व घरोब्याचे संबंध त्यांनी निर्माण केले आणि त्या संबंधांना जपलेले आहे. केवळ निवडणुकीपुरते संबंध न ठेवता ते संबंध दीर्घकालीन स्वरूपाचे आणि टिकाऊ कसे राहतील ही त्यांची धडपड खरंच प्रत्येकाच्या मनाला खूप भावते.बहुजनांच्या मुला मुलींनी शिकले पाहिजे हा अतिशय उदात्त विचार करून स्वर्गीय ॲड.आप्पासाहेबजी सरनाईक यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम जी मुहूर्तमेढ रोवली होती त्यांना मातोश्री मालतीबाई सरनाईक यांनी तोलामोलाची साथ दिली होती याच संस्काराच्या शिदोरीची सोबत घेत आणि स्वतः उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये विनम्रता,अभ्यासपूर्ण बोलण्यामध्ये एक आगळा वेगळा दिमाखदार व दिलदार विचार नेहमीच झळकत असतो. सर्वच पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यालयीन अधिकारी यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जपल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये समस्या सोडवितांना आपल्या नम्र स्वभावाने त्यांना मोठा लाभ दिलेला आहे आणि याच नम्र स्वभावामुळे शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवितांना त्यांना सर्वांचेच सहकार्य लाभते.महाराष्ट्राच्या विधान परिषदेला अनेक अभ्यासू आमदारांची परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेत ॲड.किरणराव सरनाईक हे आणखी एक नाव जोडल्या गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शिक्षण क्षेत्रामध्ये अहोरात्र कष्ट करत असताना त्यांच्या धर्मपत्नी सौ.अनिताताई आणि चिरंजीव डॉक्टर स्नेहदीप सरनाईक यांचेही सहकार्य त्यांना सदोदित मिळते.पाचही जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना त्यांनी आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानलेले आहे.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या बंधू-भगिनींना यथाशक्ती भरीव सहकार्य करून त्यांच्या प्रती कृतज्ञ होऊन "शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महानुभावाचे ऋण फेडण्यासाठी मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत
लढेन ही त्यांची साद सर्वांनाच भावुक करून जाते." विधान परिषदेमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांची भीषणता त्यांनी उजागर केली आहे आणि त्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. ह्या सर्व गोष्टी सांभाळताना जन्मजात लाभलेला नम्रपणा त्यांनी कुठेही गमावला नाही म्हणूनच कामाच्या ओढीला नम्रतेची जोड असणाऱ्या या नेतृत्वाचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवशी त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए,हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए l,
यहॉ जिंदगी तो हर कोई काट लेता है,जिंदगी जियों इस कदर की मिसालं बन जाए l
शब्दांकन :
बी.जी.काळे.
प्राचार्य,श्री शिवाजी विद्या.व कनिष्ठ.महाविद्यालय. भर जहागीर,जि.वाशीम.