वाशिमः वाशिम जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा मिळाल्यामुळे तसेच हवामान विभागाद्वारे ही शासकिय यंत्रणाद्वारे सावध करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष असलेले आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी,महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हितचिंतक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,जिल्ह्यातील मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे रुई (गोस्ता) येथील, हवामानाचा अचूक अंदाज देणाऱ्या सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे उर्फ गोपाल पाटील गावंडे यांच्या कडून भ्रमणध्वनीवरून हवामानाचा अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांनी आपल्या संवादा दरम्यान सांगीतले की, "पृथ्वीवर पर्यावरणाचा थर असल्यामुळे, वातावरणात हवेच्या कमी जास्त दाबाची निर्मिती सतत होत असते.त्यामुळे लहानमोठी चक्रीवादळेही निर्माण होत रहातात व त्याच्या परिणामाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असते." त्याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ,मध्य प्रदेशात होत असतो. सध्या निर्मिती झालेल्या "आसना" नावाच्या चक्रिवादळामुळे, बंगालच्या महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे पुढील 48 तासात पश्चिम विदर्भ,पूर्व विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिमुसळधार ते ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकाकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 48 तासात धुवाँधार पाऊस होण्याची शक्यता गृहीत धरून शेतकरी व ग्रामस्थ यांनी अधिकाधिक सतर्क राहीले पाहिजे असे त्यांनी सांगीतले. तसेच येत्या 48 तासात आपल्या भागात वाशिम,यवतमाळ, अकोला,अमरावती,बुलडाणा, हिंगोली, वर्धा,चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली ,नागपूर भागातही मुसळधार पाऊस होईल.तसेच काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून,नदी, नाले तुडूंब भरून वाहतील. ढगांचे प्रचंड गडगडाट होऊन विजाचा लखलखाट होईल. काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून,शेतकरी ग्रामस्थानी गावाबाहेर शेतामध्ये थांबू नये.शेळ्यामेंढ्या व गुरेढोरे हिरव्या झाडाखाली बसवू नये. हिरव्या झाडावर विजा पडण्याची शक्यता गृहीत धरून झाडांच्या आश्रयाला थांबू नये. महत्वाचे म्हणजे नदी,नाले,पांदण रस्त्याला पुराचे पाणी असतांना आपण ,आपली गुरेढोरे, बैलगाड्या,टू व्हिलर,फोर व्हिलर, बसगाड्या पुरामधून बाहेर काढू नये.पावसाळ्यात सडका,राज्य महामार्गावर खड्डे पडलेले असतात त्यातून वाहने वेगाने काढू नये.शक्यतो अतिमुसळधार पाऊसात वाहन चालवू नये.पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय मौसम व विज्ञान केंद्र,नागपूर यांच्याकडूनसुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रहीवासी तसेच नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.रात्रीला सुद्धा रात्रभर पाऊस पडण्याचा अंदाज असून,गावखेड्यातील नदीकाठच्या लोकांनी गावातील सुरक्षित ठिकाणी शाळा,मंदिर, सभागृहाचा आसरा घ्यावा. विजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन,प्रकाशा करीता युनव्हर्टर,बॅटरीचे दिवे, विजेरी, चार्जिंग लाईटची व्यवस्था करून घ्यावी.तसेच पुढील पंधरा दिवस पावसाचा कमिजास्त प्रमाणात,भाग बदलवीत पाऊस होण्याचा अंदाज असून गौरीपूजन व श्री गणेशोत्सवात देखील पाऊस असल्याने श्री गणेश भक्तांनी पाऊसापासून सतर्क रहाण्याची खबरदारी घ्यावी. असे हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....