नामकरणविधीच्या कार्यक्रमानंतर आयोजित भोजनातून विषबाधा झाल्याने 5 चिमुकल्या बालकांसह 28 जणांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील रोपीनगट्टा गावात गुरुवारी 4 जुलै रोजी घडला. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
रोपीनगट्टा हे गाव छत्तीसगड सीमेवरील झाडापापडा ग्रामपंचायतींतर्गत समाविष्ट आहे. गुरुवारी गावातील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीचा नामकरणविधीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर टेकाम यांनी मांसाहारी भोजन देण्याचा बेत आखला होता. कार्यक्रमासाठी टेकाम यांचे नातेवाईक, मित्र आणि गावकर्यांना आमंत्रित करण्यात आले होते. नामकरणविधी आटोपल्यानंतर जेवणास सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या पंगतीत जेवण करणार्या 28 नागरिकांना पंधरा मिनिटांतच उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे गोंधळ उडाला आणि दुसरी पंगत थांबविण्यात आली. प्रकृती बिघडलेल्या सर्वांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर 22 जणांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर 6 जणांना छत्तीसगडमधील पाखांजूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पेंढरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्न व औषध विभागाकडे अन्नाचे नमुने पाठविले आहेत. याप्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.