कारंजा (लाड) : आयुष्यभर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून,निव्वळ समाजकार्या करीता जीवन व्यतीत करणाऱ्या कुंभार समाजातील स्व.केशवराव चंपतराव खोपे यांचे गुरुवार दि. 16 नोहेंबर 2023 रोजी प्रातःकाली 05: 00 वाजता प्रदिर्घ आजाराने निधन झाले.स्व. केशवराव खोपे यांचा जीवनपट पाहीला असता दिसून येईल की, कारंजा तालुक्यातील वाई या छोट्याशा गावखेड्यातील, तळागाळातील बारा बलुतेदार कुंभार समाजातील ते सामाजिक कार्यकर्ते होते.वाई येथील ग्रामपंचायतचे सरपंच पदापासून, त्यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीची सुरुवात केली. तत्कालिन वाशिमचे खासदार गुलामनबी आझाद,आमदार अनंतराव देशमुख यांना निवडून आणण्याकरीता त्यांनी पंचक्रोशीत रात्री बेरात्री सभा घेऊन जीवाचे रान केले.पुढे पालकमंत्री अनंतराव देशमुख यांचे सचिव तथा कारंजा कार्यालय प्रमुख म्हणून काम करीत असतांना त्यांनी ग्रामिण भागातील गोरगरीब सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला. त्यानंतर योजनामहर्षी स्व. बाबासाहेब धाबेकर यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले व स्व. बाबासाहेब धाबेकर यांना आमदार म्हणून निवडून आणण्याकरीता अथक परिश्रम घेतले.पुढे जिल्हा परिषद सदस्य तसेच स्व.प्रकाशदादा डहाके यांचे सहकारी या नात्याने कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणूनही यशस्वीपणे धुरा सांभाळली.समाजाकरीता कार्यरत असतांना त्यांनी अनेक तळागाळातील व विशेषतः ग्रामिण क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तींना राजकारणात आणले. कित्येकांची विविध मंडळाची कर्जप्रकरणे मंजूर करून त्यांना लघु व्यवसायाला लावले. कित्येकांना नोकरी व्यवसाय मिळवून दिला.कित्येकांना वैघकीय सहाय्य मिळवून दिले. मात्र एवढी समाजसेवा करीत असतांना स्वतःच्या भविष्याकडे, कुटूंबीयांकडे,घरादाराकडे मात्र त्यांनी लक्ष्यच दिले नाही.हे वास्तव आहे.दुदैवाने वृद्धापकाळी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले बऱ्याच वर्षापासून ते आजारी असून,अगदी स्वतःचे सुद्धा त्यांना भानच नव्हते अखेर त्यातच त्यांचे गुरुवार दि 16 नोहेंबर 2023 रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या अर्ध्यांगीनी यांनी त्यांची अखेरपर्यंत सेवासुश्रूषा केली. आज त्यांच्या मृत्युपश्यात मुले, मुली,पत्नी,भाऊ असा फार मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या मृत्युची बातमी कळताच त्यांचे जुने सहकारी माजी सरपंच प्रदिप वानखडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी आपल्या शोकसंवेदना कळवील्या असून, "तळागाळातील दिलखुलास नेतृत्व आज हरविल्याचे" संजय कडोळे यांनी म्हटले असून,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराकडून अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.