अकोला:– शहराचे सुप्रसिद्ध आलिमे-दीन, समाजाचे मार्गदर्शक आणि मुफ्ती-ए-आझम हजरत गुलाम मुस्तफा साहेब यांचे 9 जून रोजी रात्री 11 वाजता दुःखद निधन झाले. ते काही काळ आजारी होते. 27 मे रोजी ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांना प्रथम अकोल्यातील केअर हॉस्पिटलमध्ये व नंतर नागपूरच्या एनएसएच क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे शस्त्रक्रियेनंतर त्यांना अकोल्यात परत आणले गेले आणि आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाची बातमी शहरात पसरताच शोककळा पसरली. हजारो चाहत्यांनी, अनुयायांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, धार्मिक नेत्यांनी आणि नागरिकांनी आयकॉन हॉस्पिटलकडे धाव घेतली. आज 10 जून रोजी झोहरच्या नमाजेनंतर दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा भाजीबाजार, जुना शहर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघाली. नमाज-ए-जनाजा मस्जिद इक्बाल हैदरसमोर, त्यांच्या घराजवळ अदा करण्यात आली. या अंत्ययात्रेत अकोला आणि इतर जिल्ह्यांमधून हजारो लोक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्याचे मुफ्ती-ए-आझम हजरत मुफ्ती मुजतबा शरीफ खान मिस्बाही यांनी जनाजेची नमाज अदा केली. यावेळी मुफ्ती गुफरान अत्तारी यांच्यासह अकोला जिल्हा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील अनेक उलेमाँ आणि धार्मिक विद्वान उपस्थित होते.
हजरत गुलाम मुस्तफा साहेबांना मुफ्ती-ए-बरार मौलाना मुफ्ती अब्दुल रशीद करंजवी साहेब यांच्यानंतर "मुफ्ती-ए-आझम अकोला" हा मान देण्यात आला होता. ते केवळ एक विद्वान नव्हते, तर शांती, एकता, बंधुता आणि मानवतेचे प्रतीक होते. ते दरवर्षी हरिहर पेठ ईदगाहमध्ये ईदची नमाज अदा करायचे, आणि त्यांचे खुत्बे अकोल्यात विशेष मानाने ऐकले जात.
अहले सुन्नत वल जमातचे अध्यक्ष हाजी मुदाम भाई हे त्यांचे जवळचे सहकारी होते. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आणि कच्छी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया हे नागपूरमध्ये त्यांच्या ऑपरेशनदरम्यान त्यांच्यासोबत होते.
हजरत साहेब यांचे वय सुमारे 55 वर्षे होते. ते आपल्या मागे तीन मुले, एक मुलगी, पत्नी आणि एक भाऊ असा परिवार ठेवून गेले आहेत. त्यांना चांदखान प्लॉट कब्रस्तानात सुपुर्द-ए-खाक करण्यात आले.
त्यांच्या इसाले सवाबसाठी फातेहा गुरुवार, 12 जून 2025 रोजी असरची नमाज सायं. 5:30 वाजता नंतर कच्छी मस्जिद, मोहम्मद अली चौक, अकोला येथे ठेवण्यात आलेली आहे. सर्व मुस्लिम बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन मस्जिदचे मुतवल्ली अजाज सूर्या यांनी केले आहे.
"इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन"
अल्लाह तआला मरहूम हजरत साहेबांना जन्नतुल फिरदौसमध्ये उच्च स्थान प्रदान करो – आमीन।
आपल्या प्रतिक्रिया द्या....