कारंजा : जगात असंख्य वयोवृद्ध दाम्पत्य असे आहेत की,ज्यांना एकतर जन्मतःच अपत्य (मुलबाळ)नसते.किंवा असलेले अपत्य (मुलबाळ)अकाली मृत्युमुखी पडून वयोवृद्धावर निराधार होण्याची वेळ आलेली असते.शिवाय त्यांना जवळचे नातेवाईकही नसतात.यामुळे अशा वृद्धांना आधाराकरीता, सामाजिक जवळीकतेकरीता आणि त्यांच्या विरंगुळ्याकरीता वृद्धाश्रमाचा आधार असतो.परंतु आज आम्ही पहातो अनुभवतो की, "ज्या मुलांना ह्या वयोवृद्धांनी जन्म दिला,ज्या मुलांचे लाड कौतुक करीत त्याचे शिक्षण पूर्ण केले,
त्या मुलासाठी स्वप्न उराशी बाळगून ते मुलांना कामधद्यांला किंवा नोकरी व्यवसायाला लावून त्याला स्वतःच्या पाऊलांवर उभे करतात.त्यांची संपूर्ण हौस पूर्ण करून त्यांच्या मनासारखे लग्न लावून सुनबाईला घरात आणतात.व भविष्यात लेकासुनांच्या काळात आपल्याला आपले म्हातारपण सुखासमाधानात घालवीता येईल. नातवंडा पतवंडा सोबत खेळता येईल अशी अपेक्षा बाळगून असतात." परंतु त्यापैकी आज बरीच मुले व सुना यांना घरातील ही वयोवृद्ध नकोशी वाटत असतात.आजच्या सुनांना यांचा सासरवास वाटतो.व त्यामुळे वयोवृद्धाना घरातील अडगळ समजून,वाळीत टाकल्या प्रमाणे एकीकडे ठेवले जाते.फार फार तर आईवडिल सेवानिवृत्ती वेतन कमविणारे असले तर त्यांच्या सेवानिवृत्तीचे वेतन बऱ्याच ठिकाणी आजकालच्या सुनबाई कडून ताब्यात घेतले जाते.व त्यांचेच वेतनाचे पैसे त्यांना खर्च करण्याचा सुद्धा अधिकार त्यांचे कडून हिरावून घेतल्या जात असतो.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लेकासुनाच्या जाचाने आईबाप झुरुन मरतात.किंवा घर सोडून परागंदा होतात.याशिवाय अनेक ठिकाणी आईवडिलाची घरात अडचण होतेय म्हणून त्यांना त्यांच्या मर्जी विरुध्द वृद्धाश्रमात ठेवले जाते.हे वृद्धाश्रम सुद्धा शासकिय नसून खाजगी करण्यात येत आहेत.व बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रमात केवळ शासनाचे अनुदान किंवा समाजसेवी दानशूराच्या देणग्या हडप करण्याकरीता वृद्धाश्रम चालविले जात असतात.आणि त्यामुळे कदाचित हे वृद्धाश्रम,ह्या मजबूर वयोवृद्धांना कोंडवाड्या प्रमाणे किंवा तुरुंगवासा प्रमाणे वाटत असावे.व आगीतून निघून फुफाट्यात आल्याप्रमाणे त्यांना अनुभव आला तर नवल वाटू नये. (अर्थात सगळे वृद्धाश्रम असेच असतील,असे मला म्हणायचे नाही तर सन्मार्गाने चालविण्यात येणारे सेवाभावी वृद्धाश्रम याला अपवाद ठरू शकतात.) मात्र वृद्धाश्रमाची गरज मुलेबाळे असणाऱ्या वयोवृद्ध आई वडिलांना पडूच नये.म्हणून शासनाने उपाययोजना करून, वृद्धाश्रम आपल्या देखरेखी खाली ठेवणे.वृद्धांच्या लेकी सुनांचे समुपदेशन करणे किंवा निर्दयी लेकीसुनांना चांगलीच अद्दल घडविणाऱ्या शिक्षेची तरतूद करणे.त्यांच्या वेतनामधून किंवा इतरही त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामधून दरमहा वयोवृद्धा करीता खावटीची रक्कम वसूल करण्यात आली तर बर्याच प्रमाणात वाढणाऱ्या वृद्धाश्रमाची संख्या कमी होईल.तसेच लोकसुना असणार्याना कायद्याचा वचक दाखवून वृद्धाश्रमातील वृद्धाना पोलिस संरक्षणात त्यांच्या घरी पोहचते केले तर मुलबाळ असाणाऱ्या वयोवृद्धांना वृद्धाश्रमात राहण्याची गरज पडणार नाही.व खरोखर लेकीसुना नसणाऱ्या अपत्यहीन वयोवृद्धाना खऱ्या अर्थाने वृद्धाश्रमाचा उपयोग होईल असे मला वाटते.व शासनाने खरोखर निराधार व गरजवंत निराधारांना आधार देण्याच्या दृष्टिने अहर्निश सेवाभाव ठेवणाऱ्या वृद्धाश्रमाची दर तिन महिन्यांनी तरी कडक तपासणी करून गरजवंताना सुविधा मिळतात किंवा नाही याची दक्षता घेऊनच गरजूसाठी वृद्धाश्रम नव्हे तर सेवाश्रम चालवावेत.असे आपले स्पष्ट मत असल्याचे सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी म्हटले आहे.