कारंजा : श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरीचे आजिवन प्रचारक, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे सचिव, जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाचे अध्यक्ष, इंडिया टि व्ही न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे उपाध्यक्ष विजय खंडार पाटील यांना नुकताच नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या सभागृहात झालेल्या भव्य अशा सामाजिक कार्यकर्ता संमेलनात, राज्यस्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्काराने गौरव करण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, नुकताच नागपूर येथे मदत सामाजिक संस्थेचे २० वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाला राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, झाडीपट्टी भागातील मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, गडचिरोली मधून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन डॉ प्रकाश सोनक आणि संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे यांनी केलेले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ कारंजा येथील ज्येष्ठ दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांचे हस्ते गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पूजन व हारार्पणाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गिरीष पांडव हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर आमदार अभिजीत वंजारी, लॉन्गमार्च प्रणेते विधान परिषदेचे माजी सदस्य तथा अभ्यासू आणि परखड नेते प्रा . जोगेन्द्र कवाडे, नाळ चित्रपटाच्या अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, सुप्रसिद्ध उद्योजक इंजि. रूपराज गौरी तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे हे होते. अतिशय प्रामाणिक,मनमिळाऊ, हजरजवाबी, दानशूर व्यक्तिमत्वाचे धनी असलेले, नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या अमरावती जिल्हयातील विजय खंडार यांनी दैनिक हिन्दुस्थान दैनिक मातृभूमी मध्ये पत्रकारिता करीत ग्रामिण भागातील जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे. शिवाय वाशिम जिल्हयातही पत्रकारिता व विदर्भ लोककलावंत संघटनेच्या आणि इंडिया टि व्ही न्यूजच्या माध्यमातून समाजसेवेद्वारे ते अथक कार्य करीत असल्यामुळेच मदत सामाजिक संस्थेने त्यांची संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कारा करीता निवड केलेली होती व त्यांना सदर्हु पुरस्कार प्रदान करण्यात आला.