संपूर्ण पृथ्वीवर निरनिराळी झाडे आहेत. पण केवळ वड, पिंपळ ही दोनच वृक्ष इतर झाडापेक्षा एकाचवेळी दुप्पटीने प्राणवायू उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. सर्व प्रकारची झाडांची बीज मनुष्य लावू शकतात. पण वड, पिंपळ या वृक्षाची बीज मनुष्य प्रक्रिया करून लावू शकत नाहीत. तर या झाडांची कोमल अंकुर स्वरुपातील फळ जेव्हा फक्त कावळे खातात, तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते. कावळे जेथे विष्ठा करतात तेथेच वड, पिंपळ हे वृक्ष येतात.
कावळा आपली अंडी भाद्रपद महिन्यात घालतात. त्यांना घराघरातून पोषक आहार दिला तर सृष्टी चक्र व्यवस्थित चालेल म्हणूनच संतांनी, शास्त्रज्ञांनी जाणले असावे. वृक्षाचे संवर्धन होण्यासाठी कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी. पितृपक्ष आला की, कावळ्यावर विनोद, त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा, सुशिक्षितपणा आपला जातो. आपण हिंदू असून आपल्या या रुढींची टिंगल करीत असतो. काही म्हणतात, ही प्रथा बंद झाली पाहिजे त्यापूर्वी त्यामागील शास्त्रीय आधार शोधले पाहिजे. आज हजारो रुपये देऊन आॕक्सीजन सिलेंडर मिळवावे लागते. आपण जास्तीत जास्त वड, पिंपळ यांची झाडे लावावीत आणि भरपूर आॕक्सीजन मिळवा. झाडे लावा झाडे जगवा. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे.
कावळ्याला, पशु, पक्षांना अन्न खाऊ घालणे पुण्याचेच काम आहे. परमहंस संत खटेश्वर महाराज यांचे शिष्य संत रामखटेश्वर महाराज चिमणी, कावळे तसेच कुत्रे, मांजर व ईतर पशुंना अन्न खायला दिल्यावरच स्वतः जेवण करीत असे. हा नेहमीचा त्यांचा उपक्रम होता. आज सुद्धा श्री संत खटेश्वर महाराज संस्थान, जोडमोहा ता.जि. यवतमाळ येथे कुत्रे व पक्षांना अन्नदान केले जाते. आई-वडिलांना जिवंतपणी खाऊ घालत नाही असे लोक म्हणतात पण काही लोकच आई-वडिलांना खाऊ घालीत नाहीत. मग त्यांना वृध्दाश्रमाचा मार्ग दाखवितात. सर्वांनीच आई वडील यांना वृद्धाश्रमात टाकले असते तर वृद्धाश्रम अपुरे पडले असते. हे सुद्धा जाणुन घेणे गरजेचे आहे.
संत ज्ञानेश्वरांनी कावळा घरी येऊन कावकाव करण्याला शुभ शकुन मानले आहे. त्यांनी कावळ्या विषयी प्रेम व्यक्त केले आहे. कावळा घरी येऊन कावकाव करणे याला आपले घरी पाहुणे येणार असे समजले जाते. त्यांच्या ओवी पाहू या.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ।।१।।
उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा येती ।।२।।
दहिभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांगवेगी ।।३।।
दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्या सांगे गोठी विठो येईल कायी ।।४।।
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे ।
भेटती पंढरीराजे शकुन सांगे ।।५।।
कावळा कावकाव करणे म्हणजे तो शकुन घेऊन आला की पाहुणे येणार असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. साक्षात् परमेश्वर विठुराया येणार म्हणून त्याचे पंख, पाय सोन्याने मढवीन म्हणून त्याला उडायला सांगतात. दहिभात कावळ्याला नकोसा वाटत असेल तर त्याचे ओठाला दुधाने भरलेली वाटी संत ज्ञानेश्वर महाराज लावायला तयार आहे. पण त्यावेळी कावळ्याला म्हणतात, सत्य गोष्ट सांग. खरचं माझा विठुराया येणार का रे? येथे कावळ्याप्रती ज्ञानेश्वरांच्या मनात प्रेम उफाळून आले आहे.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....