कारंजा (लाड) : मागील पंधरवाड्यातील अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील तापमान झपाट्याने कमी होऊन, गारवा निर्माण झाल्याने वैदर्भियवासियांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.परंतु वळवाच्या पावसाचे ढगाळ वातावरण निघून जाताच परत एकदा उन्हाळा परतलेला असून,सूर्यनारायण आग ओकीत असल्याचा भास होत असल्याने अंगाची लाही होत असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी मित्र असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.या संदर्भात वृत्त देतांना त्यांनी पुढे सांगीतले की, अचानक होत असलेल्या पर्यावरणातील बदलांमुळे विदर्भवासियांवर परत एकदा उष्णतेचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. सद्यस्थितीत भयंकर उकाड्याचा त्रास जाणवत असून,श्रमिकांच्या अंगाच्या घामाच्या धारा वहात आहेत.विशेष म्हणजे सध्याच्या काळात रोहिणी नक्षत्र सुरु असून "रोहिणी नक्षत्राला मृगाच्या बहीणी" म्हणून ओळखले जात असते.रोहिणीचा पाऊस गेल्या रविवार ते मंगळवार पर्यंत विदर्भ आणि संपूर्ण राज्यात भरपूर प्रमाणात बरसला होता.परंतु त्यानंतर अवकाळी पावसाचे ढग निवळले असून,तापमानाचा पारा हळूहळू वर जात आहे.मंगळवारी राज्यात जरी मान्सून पोहोचला असला तरी विदर्भात शेतकऱ्याला मान्सूनची हुरहूर लागली असून मान्सूनची प्रतिक्षा कायम आहे.या संदर्भात जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांचेशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे चालू पंधरवाडा कोरडा जाणार आहे. मात्र दि.१७ जून २०२५ पासून मृग नक्षत्राच्या उत्तरार्धातच पेरणीला पूरक असा पाऊस होणार असून,दि.२५ जून पासून राज्यात पेरण्या होणार आहेत. शिवाय जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज सर्वोत्तम आहे.ऋतुचक्राच्या नैसर्गिक वातावणाच्या सतत बदलत्या फेरबदलामुळे शेतकरी राजा मात्र चिंतेत पडला असून,मोठ्या आशेने मृग नक्षत्राच्या वाटेकडे लक्ष्य देवून पहात आहे. रविवार दि.०८ जून रोजी मृगनक्षत्राला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मृगाच्या नक्षत्रावर मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची अपेक्षा शेतकरी ग्रामस्थांना होती. व त्यामुळे अवकाळीचे ढग निवळताच हल्ली राज्यातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली असून आज रोजी शेती मशागतीच्या कामांनी चांगलाच जोर धरलेला आहे,पेरणीयोग्य जमिन तयार होत आहे. व कदाचित मृग नक्षत्रावर राज्याच्या काही भागात रिमझिम पाऊस होण्याचा राज्याच्या हवामान खात्याचा अंदाजही असू शकतो.मात्र कोणत्याही कोरडवाहू शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून, चांगला पाऊस होऊन जमिनीची शांतता झाल्याशिवाय आणि मुख्य म्हणजे, कृषी विभागाच्या सल्ल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करू नये.असे आवाहन शासनाकडून करण्यात आले असल्याचे शेतकरी मित्र ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.