अकोला - स्थानिक अकोट फैल स्थित मिल्लत उर्दू स्कुल भ्रष्टाचार प्रकरणी अल्पसंख्यांक विकास कल्याण समितीचे महाराष्ट्राचे माजी अशासकीय सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नौशाद खान समदखान यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त अमरावती यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले आहे.
स्थानिक अकोट फैल भागातील मिल्लत उर्दू शाळा हाजी नगर, तन्वीरे मिल्लत उर्दू शाळा सलाम नगर, तामिरे मिल्लत उर्दू शाळा भारत नगर ह्या शाळेच्या पायाभुत सोयी सुविधा अल्पसंख्यांक निधी शैक्षणिक सत्र २००८-०९ ते २०२४ पर्यंतच्या कालावधीमध्ये झालेला घोटाळा व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन सदर शाळेवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अकोला व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांना दि. २९/११/२०२३ रोजी देण्यात आले होते. त्यावर सुद्धा कार्यवाही न झाल्यामुळे त्याचप्रमाणे दि. १०/१/२०२४ रोजी सुद्धा महा. राज्य अल्पसंख्यांक आयोग अधिनियम २०१२ कलम १० (क) नुसार सुनावणी आयोजित करुन जिल्हाधिकारी अकोला व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांना फेर आदेश केल्यावरही अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तरी अल्पसंख्यांक आयोग महा. राज्य यांनी व संबंधीत अधिकाऱ्यांनी वरील प्रकरणावर सक्तीची कार्यवाही करुन सदर शाळांमध्ये झालेल्या घोटाळा व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन संबंधीत शाळेच्या संचालकावर योग्य ती कार्यवाही करुन सदर शाळेचे परवाने रद्द करण्यात यावे व तसेच महा. राज्य अल्पसंख्यांक आयोग यांनी दि. २९/११/२०२३ व दि.१०/१/२०२४ रोजी केलेल्या आदेशाप्रमाणे अल्पसंख्यांक आयोग महा. राज्य अधिनियम 2013 कलम १० (क) नुसार सुनावणी आयोजित करुन संबंधीतांवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यासोबतच दि. १/३/२०२४ पर्यत वरील प्रकरणावर महा. राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या समोर सुनावणी न झाल्यास व सदर शाळेवर कार्यवाही न झाल्यास ह्या मागणीकरिता दि. २/४/२०२४ रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या निवेदनाची विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.