सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय जांभळी येथील अशोक इडपाचे यांच्या गोठ्यातील तीन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जांभळी येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इडपाचे यांनी या घटनेची माहिती जांभळीचे क्षेत्र सहायक उमेश गोटेफोडे, वनरक्षक संजय चव्हाण यांना दिली. त्यांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून पंचनामा करून झालेल्या नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन इडपाचे यांना दिले. जांभळी दोडके परिसरात मागील आठवडाभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने पशुपालक व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.