कारंजा(प्रतिनिधी): कोकण किनारपट्टीसह,मुंबई, पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत पोहोचलेल्या मान्सूनमुळे मुंबई पावसामुळे तुंबण्याची शक्यता असून,अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.तर उर्वरीत महाराष्ट्रासह, मराठवाडा व पूर्व विदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.असे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सांगितले. दि. २६ मे २०२५ रोजी सायंकाळी मिळालेल्या वृत्तानुसार अमरावती,अकोला,वाशिम, हिंगोली जिल्ह्यात व पूर्व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस होत आहे.रोहिणी नक्षत्रात दि.२६ मे २०२५ ते दि.०१ जून २०२५ पर्यंत पूर्व विदर्भासह पाश्चिम विदर्भातही अधून-मधून वळवाच्या पाऊसधारा,सतत भाग बदलवीत आणि बहुंताश वेळी दुपार नंतरच कोसळणार आहेत.त्यानंतर मात्र दि ०१ जून २०२५ ते ०७ जून पर्यंत राज्याच्या मराठवाडा,पूर्व -पश्चिम विदर्भासह बहुंताश भागात निसर्ग राजा कडून उघाड राहण्याचे अंदाज आहेत. त्यानंतर मात्र मृग नक्षत्रामध्ये सर्वदूरपर्यंत पावसाचे चांगले अंदाज आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्यापर्यंतही न केलेली पेरणीपूर्व नांगरणी,वखरणी, शेतीची मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.मात्र ही शेती मशागतीची कामे सुरू असतांना, काही जिल्ह्यात दि. २६ मे २०२५ ते ०१ जून २०२५ पर्यंत पावसाचे अंदाज लक्षात घेऊन, आकाशात पावसाळी ढग किंवा वादळवारे दिसताच गावाकडे स्वगृही परतावे.या दिवसात महाराष्ट्राच्या काही क्षेत्रात विजा कोसळण्याची शक्यता आहे.त्यामुळे सावधगीरीने वागणे
. हे प्रत्येक शेतकरी,शेतमजूर,ग्रामस्थाचे कर्तव्य ठरते.त्यामुळे पाऊस सुरू असतांना शेतात आणि मुख्य म्हणजे हिरव्या झाडखाली थांबू नये. शेतातील पांदण रस्ते, नदी नाल्याला पुराचे पाणी असल्यास पुरामध्ये उतरण्याचे साहस करू नये.आपल्या शेतमालाची,पशूधनाची काळजी घ्यावी. ०१ जून २०२५ पासून मृग नक्षत्राच्या प्रारंभापर्यंत उघाड राहील.त्यानंतर मात्र मृग नक्षत्राचा पाऊस चांगला होऊन, राज्याच्या अनेक भागात पेरणीला सुरुवात होणार आहे. मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्या सल्ल्यानेच शेतातील पेरण्या कराव्यात. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.