वाशिम : क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी निक्षय मित्र म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासून नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पूर्वी देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी सद्यस्थितीत १८८ रुग्ण प्रती १ लक्ष लोकसंख्येपासून हे प्रमाण ४४ रुग्ण प्रती १ लक्ष लोकसंख्येपर्यंत व क्षयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सद्यस्थितीत ३६ रुग्ण प्रती १ लक्ष लोकसंख्येपासून ते प्रमाण ३ रुग्ण प्रती १ लक्ष लोकसंख्येपर्यंत कमी करावयाचे आहे. त्या अनुषंगाने समाजातील विविध घटकांचा सक्रीय सहभाग वाढवून क्षयरुग्णांना पोषण आहार, निदान सुविधा व व्यवसायीक पुनर्वसन या बाबींकरीता अतिरीक्त मदत मिळवून देणे व त्यासाठी सीएसआर उपक्रमाची अंमलबजावणी करणे हा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांचा महत्वाकांक्षी उद्देश आहे . क्षयरोगाविरोधात लढा उभा करण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविणे, लोकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती
करणे, क्षयरोगाविषयी Stigma दूर करणे, क्षयग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांचा होणारा खर्च कमी करणे, क्षयरुणांचा पोषणस्तर वाढवून क्षय बरा (Treatment Outcome) होण्याच्या प्रमाणात वाढ करणे या बाबी साध्य करावयाच्या आहेत. यासाठी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता जिल्हयातील लोकप्रतिनिधी, औद्योगिक संस्था, विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती, व्यापारी संघटना आणि व्यावसायीक गट, उद्याने संघटना यांच्यामार्फत क्षयरुग्णांना अतिरीक्त मदत उपलब्ध करून द्यावयाची आहे.
या मोहिमेमध्ये तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहाय्य म्हणून सहभाग नोंदवावा. सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा dtomhwsm@rntcp.org या ई- मेल आयडीवर संपर्क साधता येईल किंवा https://communitysupport.nikshay.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे, सामाजिक बांधिलकी जपत क्षय रुग्णांचे "निक्षय मित्र" व्हावे, आपणामार्फत क्षयरुग्णांना पोषण आहार, निदान सुविधा व व्यवसायीक पुर्नवसन करण्याकरीता सढळ हाताने मदत करावे. असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.