अकोला स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, रोटरी क्लब अकोला पूर्व व जागृती विद्यालय अकोला च्या माध्यमाने २७ जून २०२२ रोजी जागृती विद्यालय येथे डॉ. हेलन केलर जयंती उत्सव व दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला. मंचावर जागृती शिक्षण प्रसार संस्थेचे सचिव ॲड. विलासभाऊ वखरे, रोटरी क्लब अकोला पूर्व चे भारती शेंडे, ओमकार गांगडे, मुख्याध्यापक अरुण राऊत, महाराष्ट्र अकॅडमी चे संचालक सुशांत घुगे, योग शिक्षिका श्रध्दा मोकाशी व संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे उपस्थित होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या प्रास्ताविकात प्रा. विशाल कोरडे यांनी डॉ.हेलन केलर व लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँक अकोला ची माहिती दिली. वर्ग दहावी व बारावी मध्ये यश संपादित केलेल्या दिव्यांगांचा सत्कार शैक्षणिक साहित्य स्मृती चिन्ह व रोपटे देऊन करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून कार्य करणारे अनुराग जोशी, ओम राठोड, अथर्व उमाळे यांचा सत्कार प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थी मिरानुद्दिन व पालक सविता तायडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले.
भारती शेंडे यांनी रोटरी क्लब अकोला पूर्व तर्फे संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य राहील असे सांगितले. सुशांत घुगे यांनी संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत निःशुल्क मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. ॲड. विलासभाऊ वखरे यांनी विद्यालया तर्फे संस्थेला सर्वपरी सहकार्याचे आश्वासन दिले. समाजकल्याण अधिकारी डी.एम. पुंडे यांनी संस्थेच्या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन अनामिका देशपांडे यांनी केले. यशस्वी आयोजनाकरीता डॉ. वैष्णवी गांधी, विजयकुमार वणवे, प्रसाद झाडे, विवेक तापी, अरविंद देव, माधव जोशी, प्रा. जळमकर, विजय कोरडे, पूजा गून्टीवार, वंदना तेलंग यांनी सहकार्य केले.