चंद्रपूर, दि. 12 : महाराष्ट्रातील नागरिकांचे नेत्रस्वास्थ सुधारण्यासाठी तसेच वाढत्या मोतीबिंदुची संख्या व सर्वसामान्य आणि गरीब जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने अंधत्व निर्मूलनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम जिल्हा सामान्य रुग्णालय व कर्मवरी मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ही मोहीम 22 जुलै ते 22 ऑगष्ट २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदु रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत.
यासंदर्भात आज (दि.12) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांची व्ही.सी. द्वारे सभा घेवून अधिनस्थ अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी यांना सदर मोहिमेचे उद्दिष्ट, नियोजन व अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.
मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे : मोतीबिंदुच्या रुग्णांचे वेळीच निदान करणे, गरजु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणे, अंधत्व रोखणे व जनजागृती वाढविणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरीकांपर्यंत सेवा पोहचविणे हे आहे.
संपूर्ण जिल्हाभर या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत गृहभेटी देवून मोतीबिंदुग्रस्त रुग्णांना शोधून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदुग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.