वाशिम - (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) रस्त्यावर गतीरोधक किती असावेत याची नियमावली असते. मुख्यत: रस्त्यावरील गावे आणि फाट्यावर भरधाव वाहनाने अपघात होवू नये म्हणून दोन्ही बाजुने गतीरोधक टाकलेले असतात. मात्र वाशिम ते शिरपूर या अवघ्या २० किलोमिटरच्या रस्त्यावर ५ नव्हे १० नव्हे तर तब्बल ४३ गतीरोधक आहेत. मर्यादेपक्षा जास्त असलेल्या या गतीरोधकामुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी होत असून २० किमीचे हे अंतर दुचाकीने पार करण्यासाठी तब्बल पाऊण ते एक ताख खर्ची घालावे लागत आहे. तसेच या गतीरोधकामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असून वाहनधारकांचे कंबरडे मोडणारे हे अनाधिकृत गतीरोधक काढण्याची मागणी वाहन धारकांमधुन होत आहे.
वाशिमपासून शिरपूरला जाण्यासाठी सोईचा आणि जलद मार्ग म्हणून नोकरदार, शिक्षक, कर्मचारी आदी नागरीक आपल्या दुचाकीने जाण्यासाठी या मार्गाचा जास्त उपयोग करत आहेत. या रस्त्यावर अनेक शाळा व गावे आहेत. शहरातील लाखाळा भागातून शिरपूरला जाणार्या या २० किलोमिटरच्या मार्गावर सोनखास, तामसी, ब्राम्हणवाडा, करंजी आदी गावे लागतात. २० किमीच्या या रस्त्यावर सोनखास ते तामसी हा ३ किमीचा रस्ता कच्चा असून उर्वरीत १७ किमीचा रस्ता हा डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावर वाशिम ते सोनखासच्या पुलापर्यत एकूण १६ गतीरोधक आहेत. त्यानंतर तामसी ते ब्राम्हणवाडा पर्यत ८ गतीरोधक आहेत. तर ब्राम्हवाडा ते शेलगाव ओंकारगिर मंदिर पर्यत १३ गतीरोधक, एकट्या करंजी गावातच १० गतीरोधक असून मंदिर परिसरात ३ गतीरोधक आहेत. करंजी ते शिरपूरपर्यत ३ गतीरोधक आहेत. १७ किमीच्या या रस्त्यावर जवळपास ४३ गतीरोधक असून सोनखास ते तामसी हा ३ किमीचा डांबरी रस्ता बनल्यास या रस्त्यावर ४ ते ५ गतीरोधक निर्माण होवू शकतात. असे झाल्यास अवघ्या २० किमीच्या रस्त्यावर गतीरोधकाची संख्या ही ५० च्या घरात जावू शकते. रस्त्यालगत गावे, शाळा असल्यास संबंधीत विभाग या रस्त्यावर गतीरोधकाची निर्मिती करते. तसेच गतीरोधक कसे असावेत, त्याची उंची किती असावी याचेही मोजमाप व नियम आहेत. मात्र वाशिम ते शिरपूर या रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त संख्येने टाकण्यात आलेल्या या गतीरोधकामुळे अपघात आहेत.
गरज नसतांना या रस्त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने गतीरोधक टाकल्यामुळे वाहनधारकांना अत्यंत कमी गतीने आपली वाहने चालवावी लागत आहेत. तर वाजवीपेक्षा जास्त गतीरोधकामुळे अनेक वाहनधारकांची हाडे खिळखिळी होत आहेत. वाहनधारकांचे कंबरडे मोडणारे हे अनाधिकृत गतीरोधक कमी करावे व गरज असेल तेथेच गतीरोधक ठेवावे अशी मागणी वाहन धारकांकडून पुढे येत आहे. असे वृत्त जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे .