देशभरात राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमाअंतर्गत मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथे रासेयो विभागाने विशेष स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले. हा उपक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या पंधरवड्यातील विविध कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी परिसरातील स्वच्छतेबरोबरच वैंगंगानदी परिसरातील प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आजच्या काळात प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. नद्या, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे पाणीप्रदूषण वाढते तसेच जलीय जीवांचे जीवन धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर रासेयो स्वयंसेवकांनी नदीकाठ स्वच्छ करण्याचा निर्धार केला. या उपक्रमातून प्लास्टिक व इतर कचरा नदीकाठातून हटविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरणाचे संवर्धन व प्लास्टिक मुक्त जीवनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “स्वच्छ नदी – निरोगी जीवन” हा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे समाजापर्यंत पोहोचविला.