चंद्रपूर : पाच कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून यवतमाळ अर्बन बँकेने जयंत टॅाकीजवर सोमवारी (ता. १८) जप्तीची कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी टॅाकीजसह आवारातील सर्वच दुकानांना सील केले आहे. यवतमाळ अर्बन बँकेच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहरातील सर्वात जुनी टॅाकीज म्हणून जयंत टॅाकीजची ओळख आहे. ही टॅाकीज स्व. जयंत मामीडवार यांच्या मालकीची आहे. सध्या त्यांचा मुलाकडे या टॅाकीजचे व्यवस्थापन आहे. काही वर्षांपूर्वी जंयत टॅाकीजच्या संचालक मंडळाने यवतमाळ अर्बन बँकेकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी टॅाकीजची २५ हजार स्केअर फूट जागा गहाण ठेवण्यात आली होती. जागा गहाण ठेवण्यात आल्यानंतर बँकेनेही जयंत टॅाकीजच्या संचालक मंडळाला पाच कोटी रुपयांचे कर्ज दिले.
मात्र, या कर्जाची परतफेड आजपर्यंत करण्यात आली नव्हती. त्यामुळ यवतमाळ अर्बन बँकेने संचालक मंडळाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्याचीही दखल संचालक मंडळाने घेतली नाही. त्यानंतर नोटीसा पाठविण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही कर्जाची परतफेड करण्याबाबत कोणत्याच हालचाली संचालक मंडळाने केल्या नाही. पाच कोटींवर आता आठ कोटींचे कर्ज झाले. वारंवार पत्रव्यवहार, नोटीसा पाठविण्यात आल्यानंतरही कर्ज भरत नसल्याचे पाहून यवतमाळ अर्बन बँकेने पोलिसांच्या बंदोबस्त्यात जप्तीची कारवाई केली.