कारंजा (लाड) : स्थानिक सर्वधर्मियांचे तिर्थक्षेत्र ऐतिहासिक कारंजा शहर,शातंता व सौहार्द्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. पोलीस स्टेशन व शांतता समितीच्या निर्देशाने येथील जनता सण आणि उत्सव मनमिळाऊपणाने,मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे करीत असतात.
नुकताच कारंजा येथील आंबेडकरी जनतेने,अतिशय आनंदोत्साहात व मुख्य म्हणजे शिस्तबध्द पद्धतीने,विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. यामध्ये उल्लेखनिय म्हणजे भिमरायांची सर्व लेकरे शुभ्र गणवेशात पारंपारिक लोककलेच्या वाद्यांना प्राधान्य देऊन भारतीय खेळाचे बंधुभगीनींचे लेझीमपथक घेऊन सहभागी झाले होते.
त्यांच्या या कार्याची दखल कारंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आधारसिंग सोनोने यांनी स्वतः घेऊन त्यांचे कौतुक तर केलेच, शिवाय डि जे वाद्याला फाटा देऊन लेझीम पथकाचे उत्कृष्ट सामुहीक प्रदर्शन केल्याबद्दल १) महाबोधी विहार भिमशक्ती मंडळ पंचशीलनगर कारंजा २) एकता मित्र मंडळ,राहूलनगर कारंजा ३) बौद्ध विहार पंचमंडळ चॅरिटेबल ट्रॅस्ट,भिमनगर कारंजा यांना शहर पोलीस स्टेशन कारंजा येथे विशेष आमंत्रित करून, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला व असेच सहकार्य वेळोवेळी मिळावे अशी अपेक्षा करीत, त्यांच्या मंडळाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.