वाशिम : ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे )आजची युवा पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जावू नये यासाठी बालवयातच त्याच्या दुष्परिणामाची माहिती त्यांना झाली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयातून विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगण्यात यावे. असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची सभा 17 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनंत खेळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, केवळ शाळा आणि महाविद्यालयापुरतेच मर्यादित न राहता गावपातळीवर देखील अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामाची माहिती दयावी. शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायतस्तरावर व्यापक जनजागृती करणारे पोस्टर्स लावण्यात यावे. जिल्हयातील व्यसनमुक्ती केंद्रात आणि शासकीय रुग्णालयात अंमली पदार्थ सेवन करणारे व्यक्ती व्यसनमुक्तीचे उपचार करत असतील तर त्यांचा शोध घेवून त्यांची माहिती घ्यावी. या केंद्रांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देवून व्यसनमुक्ती उपचारासाठी आलेल्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या रुग्णांची माहिती घेवून त्यांचा पुर्वइतिहास जाणून घ्यावा. त्याला उपलब्ध झालेली अंमली पदार्थ हे कोठून उपलब्ध झालेत याची माहिती घ्यावी. असे सांगितले.
जिल्हयात कोणत्याही अंमली पदार्थाचा व्यापार, तस्करी व विक्री होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयात कुठे अफू व गांजाची अवैध लागवड होते का याबाबतची माहिती पेालीस व कृषी विभागाने घ्यावी. जिल्हयात बाहेर राज्यातून व जिल्हयातून वाहनाव्दारे गांजाची तस्करी होणार नाही यासाठी पोलीस विभागाने दक्ष राहून काम करावे. असे ते यावेळी म्हणाले.