वाशिम - गेल्या पाच वर्षापासून जिल्हयात सर्वच अशासकीय समित्यांचे गठनच झाले नसल्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांना वृध्द कलावंतांच्या समस्यांचा विसर पडल्याची खंत असून वृध्द कलावंतांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नाही.सरकारने वृद्ध कलाकार मानधनात वाढ करून दरमहा किमान पाच हजार रुपये मानधन करावे व वृद्ध साहित्यीक कलकार मानधन समितीचे गठन करून गेल्या पाच वर्षाचे वृद्ध कलाकाराचे मानधनाचे अर्ज निकाली काढून त्यांना मानधन सुरू करावे.याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास जिल्हयातील सर्व कलावंत आगामी सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकतील.असा इशारा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिला आहे.
कडोळे यांनी म्हटले आहे की, समित्या गठनाअभावी जिल्ह्यातील शेकडो वृध्द कलावंतांचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले आहेत. व उतारवयात जगण्याची धडपड करणारे वृध्द कलावंत मानधनापासून वंचित आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यांना राज्याच्या मुख्य सचिवांचे आदेश असतांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत शासकीय अधिकारी यांचीही निवड समिती स्थापन न करता,या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. हक्काचे मानधन मिळण्याच्या वाटेकडे डोळे लावून असलेले कित्येक वृध्द कलावंत मृत्यु पावले आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी विदर्भ लोककलावंत संघटनेने पदरमोड करीत अनेक आंदोलने उभी केली.मात्र निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही.एखादेवेळी दगडालाही पाझर फुटला असता,परंतु स्थानिक सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री यांना लोककलावंताची कोणतीही दयामाया येत नाही.ही दुदैवाची गोष्ट असून याचे आम्हाला शल्य आहे.जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि पालकमंत्री स्वतःची सत्ता भोगण्यात मश्गुल झालेले दिसत आहेत.त्यामुळे कलाकार निवड समितीचे त्वरीत गठीत न झाल्यास व वृद्ध कलाकाराच्या तुटपुंज्या मानधनात वाढ न झाल्यास,जिल्हयातील सर्व लोककलावंत आगामी निवडणूकीवर एकजूटीने बहीष्कार टाकणार असल्याचा इशारा संजय कडोळे यांनी दिला आहे.