अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . दिव्यांग शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी समर्पित असणाऱ्या संस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी भारतातून विविध संस्था अकोल्यात येऊन डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्याचे धडे गिरवीत आहेत .
दि.१६ ते ३० जून २०२४ दरम्यान श्री. गुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालय नांदेड येथील अभियांत्रिकी भाग १ मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूने अकोल्यात येऊन डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचा इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केला.
या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्या अडचणी येतात ? त्यावर एन.जी. ओ म्हणून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला कशा पद्धतीने दिव्यांगांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करून घेते ? संस्थेच्या लुईस ब्रेलवाचक लेखनिक बँक तर्फे दिव्यांग बांधवांना शैक्षणिक सहकार्य करण्याची पद्धती , ब्रेल लिपी प्रशिक्षण , साईन लँग्वेज , दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती व वितरण अशा विविध विषयावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या प्रशिक्षकाद्वारा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले . या प्रशिक्षणात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यश वाघमारे,विनय गुजर,क्रिष्णा तायडे,राजेश येवतकार,करण गरकळ,सुमित चोपकार,वैदेहि खापरे, जान्हवी रसे,ऋतुजा येवले,सुज्वल तायडे, नंदकिशोर जाधव या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले .दि.९ जुलै २०२४ रोजी या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेतर्फे इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे या सर्व इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रात महाविद्यालयाकडून क्रेडिट्स मिळणार आहेत. आभार प्रदर्शनात अभियांत्रिकी महाविद्यालयाचा डॉ.मनिष कोकरे, डॉ.किरण सानप या शिक्षकांनी डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या सामाजिक उपक्रमात आमचे महाविद्यालय नेहमी सहभागी असेल असे आश्वासन दिले . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आयोजित या इंटर्नशिप प्रोग्रामच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कोरडे, अनामिका देशपांडे, पूजा गुंटीवार, दुर्गा दुगाने, संजय तिडके व सरोज तिडके यांनी सहकार्य केले .