सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफी द्या.अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शेतकऱ्यांचा बहिष्कार.
*वाशीम*: आतातरी राज्यात ओला दुष्काळ जाहिर करून १००% कर्जमाफी द्या. अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शेतकरी व सामान्य जनता महायुती सरकारला माफ करणार नाही. आगामी निवडणूकीत शेतकरी व जनतेचा बहिष्कार राहील. असा इशारा जिल्ह्यातील शेतकरी मित्र तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी दिला आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,जवळचं बायका सुनांचं - दागदागीनं, सोननाणं मोडून,सावकारी पाश गळ्यात अडकवीत,कर्जबाजारी होऊन,पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर,यावर्षी वारंवार झालेच्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी पावसाने,पिकासह शेतजमीन खरडून जाण्याची, शेतात पाणी साचून शेताचे तळे झाल्याची तर काही ठिकाणी पिकांची नासाडी किंवा अक्षरशः धुळधाणी पाहण्याची वेळ आली आहे.अतिवृष्टीच्या प्रचंड संततधार पावसामुळे,राज्यातील व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळून,हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. नदीनाल्याच्या,पाझर तलाव,धरणाजवळच्या, डाबरीच्या शेतजमिनीची तर पुरेपूर असी वाट लागली आहे. आणि ज्यांच्या शेतात काही प्रमाणात शेत पिकं उभी आहेत. त्या पिकाची सरासरी येण्याची शक्यता धुसर झालेली आहे. येणाऱ्या सणासुदीच्या दिवाळी सणाच्या दिवसात त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळे आतातरी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकारानी जागे व्हावे. राज्यातील ठिकठीकाणच्या ढगफूटी पावसाचा,भयंकर पूर महापूर,मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतजमिनीवरील पिकाच्या नुकसानीचा,जीवीत हानीचा अहवाल पहावा.आणि ज्याला तुम्ही 'जगाचा पोशिंदा बळीराजा' म्हणता त्याच्या अंगातील गेलेले त्राण परत आणण्यासाठी,निसर्गापूढे हतबल झालेल्या शेतकऱ्याला परत नव्याने उभं करण्यासाठी, त्याला ताठ मानेनं आणि नव्या उमेदीनं परत शेती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी,शेतकऱ्यांना सरसकट मोबदला देण्यासाठी आता वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात,संपूर्ण राज्यात एकदा 'ओला दुष्काळ' जाहीर करावा. सरसकट सर्वांना नुकसान भरपाई द्यावी.
सर्वांना कर्जमाफी देवून,भक्कम आधार द्यावा.अन्यथा जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करून १००% कर्जमाफी देणार असाल तर ठिक अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, पंचायत समिती,जिल्हा परिषद ,नगर पालीकेच्या निवडणूकीत शेतकरी - शेतमजूर जनता तुम्हाला माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणूकीत शेतकरी व सामान्य जनतेचा बहिष्कार राहील असा स्पष्ट इशारा जिल्ह्यातील शेतकरी मित्र, दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी महायुती सरकारला दिला आहे.