कारंजा (लाड):-
श्रावणानंतर लगेच होणारे,भाद्रपदाचे आगमन म्हणजे हिंदुसंस्कृती मधील सण-उत्सवाच्या सुखद अशा आनंदाची पर्वणी.त्यातही महत्वाचे म्हणजे श्री. गणेशोत्सवात येणाऱ्या,उत्तरा नक्षत्रातील भाद्रपद शुध्द षष्ठी ते भाद्रपद शुद्ध अष्टमी पर्यंत होणारे गौराईचे माहेरी म्हणजेच भाविकांचे घरोघरी आगमन आणि अडीच दिवसांचा मुक्काम. या अडीच दिवसांमध्ये घरोघरी अक्षरशः दिपावली साजरी केली जात असते.गौराईंना आपल्या घरोघरी आणण्याकरीता,स्वतःच्या लेकीबाळींना आणावयाचे असल्या प्रमाणे मोठा थाटमाट असतो.गौराई येण्यापूर्वी घराला रंगरंगोटी,आंब्याच्या पानाची तोरणे,गुलाब-कमळ-शेवंती- जास्वंदी फुलांच्या फुलमाळा,विद्युत रंगीत दिपमाळा,तेलाच्या पणत्याचे चिरांगण आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी घर सजवीले जात असते.गौराईंची स्थापना करण्याकरीता आकर्षक असे मखर (देवालय) केले जाते. गौराई करीता महागडे शालू,पैठणी,दागदागीने आपआपल्या परिस्थितीने व इच्छेप्रमाणे खरेदी केली जातात.वेगवेगळ्या प्रकारची फळे,काजू,बदाम,अंजीर,अक्रोड,खारीक, पिस्ता,खोबरे,मनुका,खडीसाखर इत्यादिं सुक्या मेव्याचा प्रसाद, लाडू,करंजी,अनारसे इ. मिष्टान्नाचा फुलवरा,निरनिराळ्या प्रकारचे फराळी पदार्थ,खाऊचे पदार्थ,मिष्टान्नाचे भोजन केले जाते.गौराईच्या आराधनेकरीता भजन,गोंधळ,प्रवचन केले जाते. शिवाय तिन दिवस सकाळ-सायंकाळ गौराईची आरती,गौराई समोर सुहासिनींचा गरबा-झिम्मा-फुगडी इत्यादी खेळ चालत असतात.गौराई घरी आल्याचे निमित्ताने,नातेवाईक- शेजाऱ्या पाजार्यांना भोजनावळी करीता आमंत्रण दिले जाते.गौराईच्या भोजनामध्ये पुरणपोळी,ज्वारीची फळं,कथली, आंबिल,अंबाडीची भाजी,कडधान्याची ऊसळ,सोळा किंवा बत्तीस भाज्यांची एकत्र मिसळाची भाजी अशा प्रकारचा अवर्णनिय असा मेनू केला जातो. या दिवसात घरोघरी अगदी आनंद आणि अगणित अशा उत्साहाचे वातावरण दिसत असते.अशा महालक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौराईचे, गुरुवार दि.21 सप्टेंबर 2023 रोजी आगमन होणार असल्यामुळे,कारंजा शहरात व ग्रामिण भागात उत्साहाचे आनंद होते.त्यातच दुपारी पर्जन्यराजाने हजेरी लावल्याने शेतकरी राजांच्या घरोघरी तर दूधात साखर पडल्याप्रमाणे आनंद द्विगुनित झाल्याचेच दिसून आले. सायंकाळी रानातून गायी वासरे परतण्याच्या वेळी 06:00 वाजता,विधीवत गौराईची स्थापना आणि महाआरती करण्यात आली. तसेच भाद्रपद शुद्ध सप्तमी शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी महाआरती नंतर घरोघरी जेवणावळी आणि देवीचा जागर होणार आहे.व त्यानंतर भाद्रपद शुद्ध अष्टमी शनिवार दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी गौराईची ओटी भरून त्यांना शिदोरी देऊन गौराईचे विधीवत विसर्जन होणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....