कारंजा (लाड) : नुकतेच गेल्या महिन्यात दि. 08 मे 2024 रोजी साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी तथा सेवा सहकारी सोसायटी कारंजाचे हजरजवाबी व कार्यदक्ष गृपसेक्रेटरी स्व.हिम्मत पाटील मोहकर यांचे वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले होते.स्व.हिम्मत पाटील मोहकर हे मुळचे धनज जवळच असलेल्या नागलवाडी येथील रहिवाशी होते. कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये ते अतिशय प्रेमळ,मनमिळाऊ,धार्मिक व सामाजिक सेवाव्रती कार्यकर्ता म्हणूनच ओळखले जायचे.त्यांनी पूर्वी दै देशोन्नती वृत्तपत्राचे ग्रामिण पत्रकार म्हणून काम केलेले होते. गेल्या पाच वर्षापासून ते साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून सेवारत होते.तसेच ते उत्कृष्ट कवी होते. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना चिड होती. व आपल्या अनेक कवितामधून त्यांनी शेतकऱ्याची व्यथा मांडली होती.त्यांचे पाठी मागे कुटुंबात त्यांना आई,वडिल,पत्नी,मुलगी व मुलगा असा परिवार असून लहान मुलांचे छत्र निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.स्व. हिम्मत प्रभाकरराव मोहकर यांच्या अचानक झालेल्या निधनाची माहिती मिळताच वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी यांनी दि. 03 जून 2024 सोमवार रोजी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन स्व. हिमंत मोहकर यांच्या पत्नी जयश्रीताई मोहकर,मुलगी कु. संजना मोहकर,मुलगा हिमांशू मोहकर, स्व.हिमंतराव मोहकर यांचे वयोवृद्ध वडिल प्रभाकरराव मोहकर,आई,भाऊ,मेहुणे मंगेश पाटील पिसे यांचे सांत्वन करून त्यांना धैर्य दिले.खासदार भावनाताई गवळी यांनी एका सर्वसामान्य ग्रामिण पत्रकाराच्या निवासस्थानी आकस्मिक भेट दिल्याने मोहकर कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.