कारंजा २९ एप्रिल: जे.सी. हायस्कूलमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी ७:४५ वाजता प्रार्थनेने दिवसाची सुरुवात झाली. प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार संबंधित प्रयोगशाळेत जाऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळणी तासिका (हँड्स-ऑन अॅक्टिव्हिटी) पूर्ण केल्या.
नाश्त्यानंतर, आजच्या विशेष कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान गीत गात आणि सरस्वती पूजन करत करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले खगोलशास्त्र विषयक व्याख्यान. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विजयजी गिरोळकर आणि श्री. प्रविण गुल्हाणे हे खगोलशास्त्राचे तज्ज्ञ उपस्थित होते. शाळेच्या व्यवस्थापनातर्फे सौ. दीपाली ताई चवरे यांचीही उपस्थिती होती.
श्री. विजय गिरोळकर सरांनी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राच्या अद्भुत विश्वात नेले. त्यांनी सौरमंडळ, पृथ्वीचे वय, कार्बन डेटिंग, टेक्टॉनिक प्लेट्स आणि जपानमध्ये भूकंप का होतात, यावर सविस्तर माहिती दिली. तसेच ग्रेगोरियन दिनदर्शिका आणि हिंदू पंचांग यातले फरक, ग्रहण कसे घडते, दुर्बिणी, ब्लॅक होल, अल्फा स्पेस सेंटर, नवीन संशोधन, तसेच आर्यभट्ट व अन्य महान भारतीय खगोलशास्त्रज्ञांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
निभुला, उपग्रह, अंतराळयान यांसारख्या गूढ संकल्पनाही त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रश्न विचारून व्याख्यानात सहभाग घेतला. कार्यक्रम शिक्षणप्रेमी वातावरणात रंगला.
या व्याख्यानात विविध शाळांमधून आलेले विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे.सी. हायस्कूल आणि आर.जे.सी. मधील सर्व शिक्षकांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन श्री.सुधीर गोतरकर सरांनी केले.
ही दिवसभराची ज्ञानयात्रा विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची नवीन ज्योत पेटवून गेली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....