वाशिम : शुभ विवाह आणि नवरात्रोत्सवात गोंधळ जागर करून आणि घरोघरी जोगवा मागीत पोट भरणाऱ्या भटक्या जमातीमध्ये (N.T.) मोडल्या जाणाऱ्या "गोंधळी" हा समाज महाराष्ट्रात अल्पसंख्याक असून, आपल्या वाशिम जिल्ह्यात तर गोंधळी समाजाची संख्या अगदीच नगण्य असल्यासारखी म्हणजेच बोटावर मोजण्याएवढी आहे.परंतु तरी देखील भटकंती करणारा हा समाज विकासापासून अनभिज्ञ असून अनेक ठिकाणी बेघर,भूमिहिन व मागासलेपणाचे जीवन जगत असल्याचे महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.आपण जर इतिहासाची पाने चाळली तर आपणास कळेल की, हिंदुधर्मातील मुर्तीपूजक असलेला गोंधळी समाज हा मातृभक्त समाज असून ठिकठिकाणी देवीच्या मंदिराजवळ राहून गोंधळ-जागर करीत जनजागृती करणारा समाज आहे.हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये गोंधळी समाजाची महत्वाची भूमिका राहीलेली आहे.छत्रपती शिवरायांच्या विर मावळ्याच्या खांद्याला खांदा लावून गोंधळ्यांनी आपल्या शाहीरीने पोवड्यातून जनजागृती तर केलीच शिवाय,त्यांना अवगत असलेल्या नेत्रपल्लवी-करपल्लवी आणि मशाल पल्लवी ह्या पिढीजात पारंपारिक कलेद्वारे स्वराज्यासाठी हेरगिरी देखील केलेली आहे.छत्रपती शिवराय, क्रांतिविर नाना पाटील यांच्या सैन्यात शिवरायांनी युद्धकौशल्य गाजवीले.कारंजा येथील स्व. बाप्पूजी कडोळे यांनी इंग्रज काळात पोलीस विभागाच्या सैन्यात पुणे येथे सेवा देत असतांना मातृभूमीसाठी आपले कर्तव्य पार पाडल्याचा सुद्धा इतिहास आहे.महाराष्ट्रीयन लोककला जपण्यात देखील गोंधळी समाजाचा सिहाचा वाटा आहे.परभणीच्या शाहीर स्व. राजारामजी कदम ह्या गोंधळ्यानी आपली लोककला विदेशापर्यंत पोहचवली आहे. त्यामुळेच आज दिल्ली दरबारात लाल किल्ल्यावर देखील महाराष्ट्रिय संस्कृतीचे दर्शन घडवायचे झाले तर अग्रक्रमाने गोंधळी लोककलेचा सहारा घेतला जातो.परंतु दुदैव म्हणजे गोंधळी कलेचा ऊदो ऊदो करणाऱ्यांनी आजतागायत गोंधळी समाजाच्या विकासासाठी आणि गोंधळी लोककलेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कोणतीही ठोस पाऊले उचलल्या गेलेली नाहीत. अनेकवेळा राजकिय पक्षांनी आपल्या स्वार्थ सिद्धी साठी मोर्चे आंदोलने इत्यादी प्रसंगी देखील गोंधळी समाजाचा आणि त्यांच्या गोंधळी ह्या पारंपारिक लोककलेचा पुरेपूर उपयोग करून घेतला असला तरी या समाजाच्या उत्थानासाठी मात्र कुणीच काही केलेले नाही. आजही ह्या समाजाची अनेक कुटूंबे भटकंती करीत उघड्यावर संसार करीत आहेत.त्यांना राहण्यासाठी स्वतःचे भूखंड, घरदार नाही किंवा अनेक ठिकाणी मंदिराच्या आश्रयाला राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि घरकुलाचा लाभ मिळत नाही. त्यांच्या कलेला प्रोत्साहन म्हणून जाचक अटींमुळे मानधन मिळत नाही.शासकिय निमशासकिय समित्यावर स्थान मिळत नाही. सदर्हू गोंधळी समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी जाचक अटींमुळे कै.वसंतराव नाईक विकास महामंडळाचे कर्ज मिळत नाही.त्यामुळे गोंधळी समाजाचा स्वतंत्र लोकशाही,राजकिय पक्ष आणि शासनावरील विश्वास पूर्णपणे उडालेला असून,जिल्ह्यातील गोंधळी समाजाने सर्वानुमते निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचे ठरवीले आहे. तरी देखील ह्या गोंधळी समाजाच्या इशाऱ्याची दखल घेऊन जे राजकिय पक्ष आणि उमेद्वार दखल घेऊन, गोंधळी समाज विकास महामंडळ स्थापन करण्याची, सरसकट गोंधळी समाजाच्या लोककलावंताना प्राधान्याने मानधन मिळवून देण्याची, आवासाकरीता भूखंड उपलब्ध करून घरकुले देण्याची व प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी घेतील. तर आम्ही सर्वानुमते मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेऊन वचनपूर्ती करणाऱ्या राजकिय पक्ष व उमेद्वाराला विधानसभा निवडणूकीत पाठींबा जाहीर करणार असल्याचे महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.