श्री. वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पातूर येथे “सायबर शिका – सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत सायबर जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील सायबर वॉरियर्स कु. दर्शना प्रकाश वाघेला व कु. गायत्री चंद्रकांत मोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेकी वापर, मोबाईल व ऑनलाइन फसवणूक तसेच विविध प्रकारचे सायबर हल्ले याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाढलेले Instagram, Facebook, Snapchat सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फसवणुकीचे प्रकार स्पष्ट करून त्यापासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर सुरक्षेबाबत लहानशी निष्काळजीपणाही मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकते, हे सांगून सुरक्षित पासवर्डचा वापर करणे, अज्ञात दुवे (links) व संशयास्पद मेसेजेस टाळणे तसेच वैयक्तिक माहिती उघड न करण्याचा सल्ला देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली शंका दूर केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.