चंद्रपूर, दि. 30 : चामड्याच्या वस्तू वा पादत्राणे दुरुस्ती व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हा-पावसात बसून आपली सेवा देत असतात. या व्यावसायिकांना ऊन-वारा-पाऊस यापासून सरंक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती अ वर्ग व ब वर्ग नगरपालिका आणि छावणीक्षेत्र (कॅन्टोंमेंटबोर्ड) व महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा वाढविण्यात आली आहे.
त्यानुषंगाने अनुसूचित जातीच्या गटई कामगारांचे आर्थिक उन्नती होण्यासाठी गटई स्टॉल योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण चंद्रपुर या कार्यालयाकडे उपलब्ध आहे. तरी या योजनेचा अनुसूचित जातीच्या गटई कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
पात्रतेचे निकष : 1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनु. जाती संवर्गातील असावा. 2. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागासाठी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. 3. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. 4. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड यांनी त्यास भाड्याने, कराराने खरेदी अगर मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी.
आवश्यक कागदपत्रे : 1. अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला 2. मागील संपलेल्या आर्थिक वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला 3. शाळा सोडल्याचा दाखला 4. रेशन कार्डाची झेरॉक्स (साक्षांकित प्रत) 5.आधार कार्डाची झेरॉक्स प्रत 6. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे. ती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांनी भाड्याने/कराराने/खरेदीने/स्व:मालकीची असल्याबाबतची भाडेचिठ्ठी, कराराची प्रत किंवा खरदी खताची साक्षांकित प्रत 7. ग्रामसेवक/ सचिव यांचे गटई काम करीत असल्याचे प्रमाणपत्र 8. अर्जदार रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करीत असल्याबाबतचे ग्रामपंचायत/नगरपालिकेचे व्यवसाय प्रमाणपत्र व या जागेवर बसून काम करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय करतानाचा पोस्टकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे 9. अधिवास प्रमाणपत्र.
अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यकआयुक्त, समाज कल्याण कार्यालय चंद्रपुर येथे सादर करावा. अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर येथे तसेच 07172 – 253198 वर संपर्क करावा.