अकोला:- ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी, माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी १९८६ साली राजकीय संन्यास घेऊन भारताला पर्यावरण साक्षर करण्यासाठी व वनीकरणाच्या जन आंदोलनासाठी वनराई चळवळीची स्थापना केली. ५जुलै १९८८पासून अकोल्यात वनराईची सुरुवात झाली.५ जुलै हा अकोला वनराईचा वर्धापन दिन त्याचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले विद्यालयाने कृषी नगर परिसरात 'झाडे लावा--झाडे जगवा'असा संदेश देत वृक्ष संवर्धन रॅली काढली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून 'पर्यावरण वाचवा नाही तर विनाश अटळ आहे' असा संदेश दिला. अकोला वनराईचे समन्वयक बबनराव कानकिरड, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .मंदाकिनी तळोकार,सौ संगीता निचळ यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपल्या घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणारे कडुलिंब, आंबा, जांभूळ व मोकळ्या जागेत, मंदिर परिसरात वड,पिंपळ, औदुंबर, अर्जुन, रामफळ ,सिताफळ यासारख्या देशी बहुगुणी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून वनराई चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी तळोकार यांनी विद्यार्थ्यांना वनराईची प्रतिज्ञा दिली.
'पेड अन्न का दाता है -फिर क्यो काटा जाता है', ' कावळा करतो काव काव-म्हणतो माणसा झाडे लाव' अशा पर्यावरण विषयक घोषणांनी परिसरात चैतन्य पसरले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्यांना व नागरिकांना कडुलिंब, आंबा, जांभूळ, बदाम ,करवंद, वड,पिंपळाची रोपे भेट देऊन वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले.
जवाहर नगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम, गोकुळ कॉलनी, मदर तेरेसा कॉन्व्हेंट, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कृषी नगर परिसरात वृक्ष संवर्धनाचा संदेश देत वनराई जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन ज्योती इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा रंधे यांनी केले. नशाबंदी मंडळाच्या व्यसनमुक्ती फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक ,वनराई ,नशाबंदी मंडळ, सर्वोदय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....