शिर्डी : श्रीक्षेत्र शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत असून, श्री साईबाबा वरील निस्सिम श्रध्देपोटी शिर्डी येथील संस्थानमध्ये संपूर्ण भारतातील हिंदु मुस्लिम भाविक भक्त मंडळी साईबाबांच्या समाधी स्थळी चरण पादुकांवर लिन होण्याकरीता दररोज हजारोच्या संख्येने येत असतात. परंतु आजपर्यंत येथे गरीब-श्रीमंत असा दुजाभाव दिसत होता . तसेच महत्वाचे म्हणजे येथे व्हिआयपी व्यक्तिंना साईबाबा समाधी मंदिरा समोर लावलेल्या काचेचे आतून जात, जवळून दर्शनाची मुभा होती . तर इतर सर्वसामान्य साईभक्तांना मात्र समाधी समोर लावलेल्या काचेचे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागायचे. त्यामुळे साईभक्ताची निराशा होत होती. व त्यांना पदस्पर्शन दर्शना पासून वंचित ठेवले जात होते . त्यामुळे वेळोवेळी साईभक्तांची दर्शनाची होणारी गैरसोय बघून, साईभक्तांकडून समाधी मूर्ती मंदिराच्या काचा हटवून थेट दर्शनाची परवानगी मागीतली जात होती. तसेच द्वारकामाई दर्शनाची सुद्धा मागणी केली जात होती. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला वेळोवेळी प्राप्त होत होते. अखेर साईभक्तांच्या मागणीची दखल घेऊन आणि साईभक्तांसमोर नतमस्तक होत, अनेक क्रांतिकारी निर्णय घेत, श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दूर वरून साई दर्शनार्थ येणाऱ्या साईभक्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून, थेट समाधी पदस्पर्श दर्शनाला मोकळीक देण्याचा निर्णयच घेतला असून, समाधी स्थळा समोरील काचा हटविण्यात आल्या आहेत . त्यामुळे साईभक्तामध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे वृत्त दि . १० नोहेंबर रोजी, शिर्डी येथून पत्रकार संजय शिंगनाद यांनी दूरध्वनीद्वारे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळविली असून साईभक्ताचे थेट समाधी पदस्पर्श दर्शन सुरु झाल्याचे वृत्त मिळाले आहे.