यवतमाळ /वाशिम :
आज खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.सी आर.पाटील जी यांची भेट घेतलीयवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील पुसद माळपठार भागातील ४२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, या भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इसापूर धरणातून लिफ्ट इरिगेशन प्रणाली सुरू करावी, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर.पाटील जी यांच्याकडे केली.
आज नवी दिल्ली येथे झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत पुसद माळपठार भागात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या सिंचन समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. या भागातील शेतकरी दुष्काळजन्य परिस्थितीचा सातत्याने सामना करत असून, इसापूर धरणातील पाणी योग्य नियोजनातून लिफ्ट इरिगेशनद्वारे या गावांमध्ये पोहोचल्यास शेतीसाठी संजीवनी ठरेल.
पुसद माळपठार भागातील पाण्याची स्थिती आणि उपाययोजना
पुसद माळपठारातील ४२ गावे सिंचनाच्या सुविधेअभावी पाण्यावर अवलंबून शेती करू शकत नाहीत.
यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि स्थलांतराच्या समस्येला तोंड देत आहेत.
इसापूर धरणातून लिफ्ट इरिगेशन प्रणाली विकसित केल्यास या गावांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध होईल.
या भागातील कमी पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यामुळे शेती हवालदिल झाली आहे.
दिग्रस तालुक्यासाठी अरुणावती धरणाच्या पाण्याचा उपयोग करण्याची मागणी
या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्काविषयीही सविस्तर चर्चा केली. अरुणावती धरणाच्या पाण्याचा फायदा धरणग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळावा यासाठी तेथील Lift Irrigation System सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
अरुणावती धरणाच्या पाण्याचा उपयोग इतर भागांसाठी होत असला तरी, प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांची जमीन धरणात गेली, त्यांना मात्र सिंचनासाठी पाणी मिळत नाही, ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन Lift Irrigation System च्या माध्यमातून त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री यांची सकारात्मक भूमिका
या चर्चेदरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर.पाटील जी यांनी पुसद माळपठार भागातील आणि दिग्रस तालुक्यातील पाण्याच्या समस्येवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. इसापूर आणि अरुणावती धरणातील पाण्याचा योग्य पुनर्वाटप करण्याच्या दृष्टीने लवकरच अभ्यास करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी आपण सातत्याने संघर्ष करत राहू, तसेच शासनाकडे ठोस मागण्या मांडत राहू, असा निर्धार खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केला.
वाशिम जिल्हा पैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पातून वगळला.
वाशिम जिल्हा नदीजोड प्रकल्पाच्या योजनेत वगळण्यात आले असून, यामुळे येथील हजारो शेतकरी सिंचनाच्या सुविधांपासून वंचित राहणार आहेत. या संदर्भात खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्याचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याची मागणी केली.
पुसद आणि दिग्रस भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सिंचन योजनांवर तातडीने निर्णय घेतला जावा, अशी मागणी लवकरच संसदेतही उपस्थित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....