११ सप्टेंबर पर्यंत मागितला समितीला अहवाल.!
वरोरा शहरातील नाल्याच्या सांडपाण्यामुळे शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.!नाल्याचे सांडपाणी दुसरीकडे वळवून शेतकऱ्यांची झालेल्या नुकसान भरपाईची आहे मागणी
वरोरा :
शहरातील नाल्यांच्या सांडपाण्यामुळे शेतीचे व शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे नाल्यांचे सांडपाणी दुसरीकडे वळविण्यात यावे व कास्तकारांना झालेल्या नुकसानीची भरपाई व कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरीता उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याकरीता समीती नेमण्यात आली आहे.
या समितीत तहसिलदार योगेश कौटकर, मुख्याधिकारी गजानन भोयर, सा. बां. उपविभागाचे उपविभागीय अभियंता रवि मत्ते, जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता अरुण झाडे, डब्लुसीएल माजरी एरीयाचे अभियंता व्यंकटेश गोरख, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषन उपविभागाचे उपअभियंता जामकर, शेतकरी प्रविण तडस, सचिन बुरिले यांचा समितीमध्ये समावेश आहे.
सविस्तर असे की, वरोरा शहरातील नाल्याच्या सांडपाण्यामुळे शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्याचे सांडपाणी दुसरीकडे वळवून कास्तकारांना झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून पीडित शेतकऱ्यांनी स्थानिक तहसीलदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
यामध्ये प्रविण तडस, संजय लोहकरे, जगण ढाकणे, सचिन बुरीले, विकास देवागडे, उमाकांत उरकुडे, राजेंद्र कुरेकार, रामचंद्र उरकांडे, अविनाश कुरेकार, दिनकर फडके, वसंत धोपटे, भोलाशंकर गोवारदिपे, आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.
वरोरा शहरालगत परंपरागत शेतजमीनी असून शेतकरी तिथे शेती करतात. दरवर्षी वरोरा नगरपरिषद द्वारे शहरातील नाल्यामधून वाहणारे सांडपाणी नगरपालीकेच्या हद्दीच्या बाहेरील माढेळी रस्त्यापासून ते तुळाना गावाकडे जाणाऱ्या नाल्यात सोडल्या जाते. त्यासाठी सांडपाणी माढेळी रस्त्याकडून शेताच्या दिशेने वळविण्यात आले आहे. हा प्रकार पालिका प्रशासनाने जाणून बुजून केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रत्येक वर्षी नाल्याचे खराब सांडपाणी हया भागातील कास्तका-यांच्या शेतातून जाणुनबुजून सोडले जाते. नगरपालिकेकडे सांडपाणी सोडण्यासाठी पर्यायी मार्ग असून सुध्दा पावसाळ्यामध्ये शहरातील सांडपाणी याच नाल्याद्वारे सोडल्या जाते. परिणामी नाल्याचे पाणी भरपूर प्रमाणात शेतात येते. आसपासच्या शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांचे त्या क्षेत्रातील शेतजमीन पाण्याखाली बुडते. यामुळे शेतीची मशागत व पीक पेरणी शेतात करता येत नाही. शेतीतील वाहती पूर्ण बुडते. पिक उत्पन्न घेता येत नाही. शेतक-यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच शेतात जाणे-येण्याचा मार्ग पूर्ण बंद होते.
सदर क्षेत्र हे नगरपालिका हद्दीच्या बाहेर असून नाला हा नगरपरीषद मालकीच्या जागेतून जात नाही व ज्या शेतजमीनीतून नाला गेला आहे तो शेतक-यांच्या मालकी हक्काच्या शेतीतून गेला आहे. हे क्षेत्र शेतक-यांच्या शेतीपैकी असून शेतक-यांच्या मालकी अधिकाराला बाधा पोहचत आहे.
या समस्येचा विचार करता नगरपालिका प्रशासनाने पर्यायी मार्ग काढावा तथा शेतक-यांच्या आर्थिक व मानसीक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी निवेदनातून केली होती.
यावर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात बैठक पार पडली व समिती नेमून आदेश पारीत करण्यात आला आहे. सोबतच ११ सप्टेंबर पर्यंत समितीला अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहे.
मोहसिन सय्यद वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....