राष्ट्रसंतांचे मुळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. भक्ती संपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर होती. बाल माणिकला आईवडिलांनी वरखेडच्या सिद्ध पुरुष परमहंस आडकोजी महाराज यांचे दर्शनाला नेले. आडकोजी महाराजांनी माणिकला पोटाशी धरुन ओठाला भाकरीचा तुकडा लावला व "तुकड्या तुकड्या" असा जयघोष सुरु केला. पुढे जन्मनाव माणिक ऐवजी "तुकड्यादास" हेच नाव प्रसिद्ध झाले. एके दिवशी आडकोजी महाराज यांचे जवळ बसून तो तुकोबारायांचे "तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी" असे भजन गात असताना आडकोजी महाराज म्हणाले, "तुका म्हणे, तू कां म्हणतं. तू आता तुकड्या म्हणे म्हण" ही सद्गुरुची आज्ञा मानून तुकड्यादास स्वतःचे काव्य, भजन करु लागले.
विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन् विशेषतः आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. अनेकात एकत्व शोधताना खेड्यांमध्ये या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रत्येक गाव "तीर्थ" होईपर्यंत राष्ट्रसंताच्या विचाराचा प्रसार होण्याची जास्त गरज आहे, असे मला वाटते.
राष्ट्रसंतांची श्री विठ्ठल भक्तीः--
पंढरीचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. विठ्ठलाची भक्ती करणारे हे विष्णुचीच भक्ती करतात म्हणून वारकऱ्यांना वैष्णव म्हटल्या जाते. संत परंपरेतील एक अनोखे संत विदर्भाचे भूमीमध्ये जन्मलेले रत्न म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. वयाचे आठव्या वर्षापासून घर सोडणाऱ्या राष्ट्रसंतांना परमेश्वर प्राप्तीचा जो ध्यास लागला होता. जी तळमळ त्यांच्या मनामध्ये लागलेली होती. त्यांचे अंतिम ध्येय विठ्ठलाचे चरण होते.
महाराजांनी साधनेच्या काळानंतर आपल्या पंढरीच्या वारीमध्ये कधीही खंड पडू दिला नाही. भक्तीचे माहेरघर असलेले पंढरपूर हे त्यांना आत्मानंदाचे ठिकाण झालेले आहे. पंढरीचा कण आणि कण विठ्ठलमय झालेला त्यांना दिसून आला, म्हणूनच त्यांना भक्ताच्या हाकेला धाऊन जाणाऱ्या आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या विठ्ठलाच्या रुपामध्ये जीवलग सखा दिसत होता, म्हणूनच एका भजनामध्ये ते म्हणतात.
चला हो पंढरी जाऊ ।
जिवाचा जिवलगा पाहू ।।
राष्ट्रसंतांनी सुद्धा हा जीवनरुपी नौकेचा सहारा घेतल्याशिवाय पर्यायच नाही असे सांगितले. भक्तीनेच मुक्ती प्राप्त करता येते. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणूनच महाराज मोठ्या आनंदाने आणि प्रेम भक्तीने म्हणतात.
वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन ।।धृ।।
ऐसे आहे माझ्या मनी ।
लोळेन संतांच्या रजकणी ।।१ ।।
रंग लावीन अंतरा ।
हरुनी देहभाव सारा ।।२।।
तुकड्या म्हणे होईन दास ।
देवा ! पुरवा इतुकी आस ।।३।।
राष्ट्रसंतांचे घराने वारकरी असल्यामुळे त्यांना विठ्ठलभक्ती आवडीने करावीशी वाटत होती. ते म्हणतात की, विठ्ठलाचे भेटीकरिता विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरीला नाचत जाईन. आणि तेथे जाऊन संतांच्या चरणी लोटांगण घालीन. शेवटी श्री विठ्ठलाशी एकरुप होऊन त्याची सेवा करण्याची इच्छा व्यक्त ते करतात. म्हणूनच या अभंगाच्या शेवटी ते म्हणतात . "तुकड्या म्हणे होईल दास, देवा पुरवी इतुकी आस ।।" यावरून त्यांची विठ्ठलाप्रती असलेला श्रद्धाभाव कीती पराकोटीचा होता याचा अनुभव होतो.
महाराजांनी समाज कार्याला आणि देश कार्याला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सेवा हीच त्यांची भक्ती झाली. परंतु त्यांचे पंढरीवरील प्रेम कमी झाले नाही, उलट त्यांनी भक्ती समाजोपयोगी कशी करता येईल या दृष्टीने विचार सुरु केला. ते म्हणतात. मंदिरात जाऊन देवदेव करुन नारळ फोडून, पूजा करुन देव प्राप्त होत नसतो. यामुळे भक्ती होत नसते तर परमेश्वराने निर्माण केलेला प्रत्येक प्राणीमात्रांची सेवा करणे हीच खरी भक्ती होय. हाच संदेश त्यांनी ग्रामगीतेमधून दिला.
राष्ट्रसंतांना ग्रामगीता लेखनाची प्रेरणा २२ जुलै १९५३ रोजी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरी मिळाली. तेथूनच ग्रामगीतेचे काव्य लेखन सुरु केले. भगवान श्रीकृष्णाने मायेच्या बंधनामध्ये अडकलेल्या अर्जुनाला गीता सांगून धर्माचा मार्ग सांगितला तर आधुनिक युगामध्ये कर्मकांड आणि अज्ञानात सापडलेल्यांना, सामान्यजणांना उपदेश करण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. महाराज ग्रामगीतेत लिहितात.
पुण्यक्षेत्र पंढरपूरी, बैसलो असता चंद्रभागे तीरी ।
स्फुरु लागली ऐसी अंतरी, विश्वाकार वृत्ती ।।
अशाप्रकारे त्यांना पांडुरंगाच्या अस्तित्वाचा साक्षात्कार झाला आणि भगवंताने त्यांना स्पष्ट आदेशच दिला.
तेथे दृष्टान्त होई अद्भूत ।
कासया करावी विश्वाची मात ।
प्रथम ग्रामगीताची हातात, घ्यावी म्हणे ।।
राष्ट्रसंतांनी हा आदेश मानून पंढरपूर येथेच ग्रामगीतेची रचना केली. संत नामदेवा बरोबर भगवान पांडुरंग ज्याप्रमाणे बोलत होते. त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होते, तेच रुप याठिकाणी भगवंताचे दिसत आहे म्हणून महाराजांनी ग्रामगीतेच्या रचनेचे होय. ग्रामगीतेचे श्रेय ते स्वतः न घेता पांडुरंगालाच देतात आणि स्वतः निमित्त मात्र राहिले आहोत म्हणतात.
उभा विश्वाचिया, सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर ।
त्याच्या कृपेचाही विस्तार ।
तुकड्या म्हणे ग्रामगीता ।।
राष्ट्रसंत याठिकाणी एक संत म्हणून राहत नाही तर ते विठ्ठलाचे एक निस्सीम भक्तच होऊन जातात. ६ जुलै १९६८ रोजी पंढरपूर येथील हनुमान मंदिर मैदानात आषाढी एकादशीला अखेरचे भजन राष्ट्रसंतांचे झाले होते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून साध्या सरळ भक्तीची शिकवण दिली व त्या भक्तीला आचरणाची जोड दिली. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा भजन, ओवी आणि अभंगातून तीच शिकवण दिली म्हणूनच पंढरपूरला जाणाऱ्या हजारो लाखो भक्तामध्ये एक राष्ट्रसंत आहेत. तुकडोजी महाराज विठ्ठलाला शेवटी प्रार्थना करताना म्हणतात.
येवू दे दया आतातरी गुरुमाऊली ।
या आयुष्याची दोरी कमी जाहली ।।
अशी हाक मारली. ज्या विठ्ठलाच्या साक्षीने भजन सेवा सुरु केली, शेवटी त्याच्या समोरच आपली भजन सेवा संपविली. महाराजांनी श्री विठ्ठल आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये कधीच भेद केला नाही. श्रीकृष्णावर महाराजांची १०८ भजने लिहिलेली असली तरी श्री विठ्ठल, पंढरी महात्म्य आणि नामाचे महत्त्व यावरही भजने आणि अभंग लिहिलेले आहेत. महाराजांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे भ्रमण केल्यानंतर त्यांना शेवटी म्हणावेच लागले.
पंढरीचे सुख नाही कोण्या धामा ।।
यामधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वारकरी होते व यावरून त्यांची विठ्ठल भक्ती दिसून येते. जयगुरु ! जयहरी !!
गीता सिखाती कर्म कर ।
पर मोह ना धर भोग का ।।
गीता सिखाती धर्म कर ।
सच न्याय से संजोग का ।।
गीता सिखाती सबका भला हो ।
तू ना रहे अपने लिये ।।
लहरकी बरखा
पुरुषोत्तम बैसकार मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....