नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवून जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला केशारी पोलिस स्टेशन अंतर्गत नागनडोह जंगल परिसरात गोंदिया पोलिसांकडून अटक करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या इसमाच्या पाठीवरील बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये १ डेटोनेटर, १ जिलेटीनची कांडी अशी स्फोटके, साहित्य आढळून आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांमुळे देशातील अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका असेलल्या व भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या माओवादी नक्षलवादी संघटना दरवर्षी जानेवारी ते जून दरम्यान टि.सी.ओ.सी. कालावधी पाळून या दरम्यान प्रशासनाविरुद्ध बंड पुकारतात. अवैधरित्या स्फोटके व साहित्य गोळा करून देशविघातक घातपाती घटना, विध्वसंक कृत्य घडवून जनमाणसात दहशत पसरविण्याचे आणि आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करतात.
या अनुषंगाने गोंदिया पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्हयातील नक्षल प्रभावित भागातील क्षेत्रात नक्षल हालचाली संबंधी गोपनीय यंत्रणा सक्रिय केली. माओवादी नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्यांची माहिती काढून, नक्षल्यांचे दहशतवादी मनसुबे हाणून पाडण्यासाठी जास्तीतजास्त माहिती संकलित करून, दहशतवादी कारवायांवर आळा घालण्याचे निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे गोंदिया पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गोपनीय यंत्रणा सक्रिय करून, माओवादी-नक्षलवादी यांना मदत व सहकार्य करणारे तसेच त्यांना साहित्य पुरवणाऱ्यांची माहिती घेण्यात येत होती.
या अनुषंगाने ३१ मार्च रोजी गोंदिया जिल्हा पोलिस पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलिस ठाणे केशोरी अंतर्गत भरनोली लगतच्या नागनडोह जंगल परिसरात घनदाट जंगलात एक व्यक्ती पोलिसाविरुद्ध घातपाती, विध्वंसक कारवाई करण्याच्या दृष्टीने माओवादी-नक्षलवादी यांना स्फोटके व इतर साहित्य देण्याकरिता जंगल मार्गाने जाणार आहेत.
खात्रीशिर माहितीवरुन नक्षल्यांचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी मिळालेल्या माहितीप्रमाणे, पोलिस पथकाने स्फोटके घेवून जाणार असलेल्या व्यक्तीला जेरबंद करण्याच्या दृष्टीने नागनडोह जंगल परिसरात सापळा रचून घनदाट जंगल परिसरात संशयितरित्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेवून जात असताना एका इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाच्या पाठीवरील बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये १ डेटोनेटर, १ जिलेटीनची कांडी अशी स्फोटके, साहित्य आढळून आले.
या प्रकरणी किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (वय ३१ वर्षे, रा. खारकाडी, पोस्ट-हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली) याच्याविरुद्ध पोलिस ठाणे केशारी येथे भारतीय स्फोटक पदार्थ प्रति. अधिनियम, बेकायदेशिर कृत्ये (प्रति.) अधिनियमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. संबंधित ईसमास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी हे करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी हा टीपागड दलमचा सक्रीय सदस्य असून, याने २००९ मध्ये गडचिरोली पोलिसांविरुद्ध नक्षलवाद्यांनी मरकेगाव, हत्ती गोटा येथे केलेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचे, तसेच २०११ मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ला आदी घातपाती हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगितले आहे.
ही उत्कृष्ठ कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलिस निरीक्षक संजय नाईक, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, पोलिस हवालदार भैय्यालाल किन्नाके, मुस्ताक सैय्यद, लक्ष्मण घरत, सुरेंद्र हिचामी, पोलिस शिपाई आशिष वंजारी, पोलिस नायक उमेश गायधने, मोनेश तुरकर यांनी केली आहे.
गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, भारत सरकारद्वारे प्रतिबंध घातलेल्या माओवादी-नक्षलवादी संघटनांचे सरकार व प्रशासनाविरूद्ध पुकारण्यात येणारे बंड हाणून पाडण्यासाठी सहकार्य करावे. पोलिस प्रशासनास सहकार्य करणाऱ्याचे व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येवून प्रशासनातर्फे बक्षीस देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नक्षलवादी चळवळीत सामील असलेल्या नक्षलवाद्यांना देखील प्रशासनद्वारे असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी घातपात व हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या बक्षिसाची रोख रक्कम, तसेच विविध सुख-सुविधां चा लाभ घेऊन समाजाच्या मुख्यप्रवाहात समाविष्ट होऊन आपले जिवन सुखी-समृद्ध करावे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....