वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील थोर समाज सुधारक होत. त्यांनी ग्रामगीता, लहर की बरखा, आनंदामृत, मराठी भजने १२६०, अभंग २१०९, हिंदी भजने २३६९ असे अनेक साहित्य लिहीले. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. आपण खाली दिलेल्या भजनाचा भावार्थ समजून घेऊ या.
कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडूनी दे जंजाल ।
तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवासी घाल ।।धृ।।
विश्वास ठेवून कर्मावरती तू काट्यांमधील अवघट वाटांमधून पुढे चालत रहा. तू कोठेच थांबू नकोस. जंजाळ म्हणजे त्रास, कष्ट, दगदग, चिंता, गुंतागुत, संसारातील अडीअडचणी, अहंकार रुपी काटे सोडून पुढे चालत रहा. या मार्गावर चालतांना तुला एकट्याला चालावे लागेल आणि आपली मंजिल मिळवावी लागेल. कारण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी । आपले संसारीक गोष्टीमध्ये अडकलेले मन मुक्त करा. शिष्य निर्मळ, सद्वर्तनी, निष्ठावान, परमदक्ष असायला हवा. तुझ्या सत्वगुणांची माळ तु तुझ्या गुरुदेवासी घाल. जो शिष्य सत्वगुणाची कास धरेल, त्याला गुरुदेव आपणासारिखे करिती तात्काळ. गुरुशिवाय विद्या नाही. जिज्ञासा हे शिष्यत्व तर ज्ञान हे गुरुदेव होय. गुरुदेवाचे चरणी व वचनावर पूर्ण निष्ठा सेवाभावाने ठेवावी. कारण सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे । हे फक्त आपल्याला एकट्यालाच करावे लागेल. वासनेने भरलेले मन जेव्हा पवित्र कराल तेव्हाच गुरुदेवाला आपली माळ घालावी.
म्हणतील कोणी वेडा तुजला, जरा न ऐकी त्यांचे ।
सत्कर्माला चिकटोनी राही, उणे न चित्त कोणाचे ।
जरी तू झालासी कंगाल, अपुल्या संकल्पाला पाळ ।।१।।
संसार हा दुःखमय आहे. संसार करुन परमार्थ, देवाची भक्ती करायला गेला तर लोक वेडा म्हणायला मागेपुढे पाहत नाही. चांगल काम करावं किंवा वाईट काम केलं तरी लोक आपल्याला मुळीच करु देत नाहीत. अशा लोकांचे तू मुळीच ऐकून घेऊ नकोस. सत्कर्म म्हणजे नैतिक किंवा धार्मिक कृती. त्यामुळे इतरांचे कल्याण होते आणि आपल्या मनाला आनंद, समाधान मिळते. तु सात्त्विक कर्म करत रहा. चित्त उणे म्हणजे चित्त मलीन होणे. चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहं यांच्या तरंगाचा साठा असतो. आपले चित्त त्रिगुणांनी संस्कारीत असतं. अनंत संकल्प - विकल्पांनी भरलेल चित्त तू मलीन होऊ देऊ नकोस. कंगाल म्हणजे ज्याच्याकडे पैसे किंवा संपत्ती नसेल, तरी तु जे गुरुदेवा करिता आपल्या मनात निर्माण झालेल्या संकल्पाला तू पाळ. तुझी सत्वगुणाची माळ तुझ्या गुरुदेवासी प्रेमाने घाल.
खोटा धंदा नाही म्हणुनी, छदाम नाही गाठी ।
पैसापाशी सर्व राहती, छल-बल पापे मोठी ।
पापापाशी राहतो काल, करण्यासाठी जीवाचे हाल ।।२।।
खोटा धंदा म्हणजे लोकांना फसविणे, ज्यात काही विकृती किंवा खोटं असेल असा खोटेपणा तु कधीच करु नकोस. छदाम म्हणजे पैशाचा चवथा भाग. जास्त पैसा असेल तर वासना जोर करते. तुझ्याकडे कमी पैसा असला तरी खोटा धंदा करु नकोस. खरा धंदा म्हणजे असा धंदा ज्यात पूर्ण मजूरी दिली जाते आणि चांगले काम होते. तु पैसा वाईट मार्गाने खर्च न करता चांगल्या मार्गाने खर्च करावा. पैसा हा महत्त्वपूर्ण घटक प्रत्येक मानवाच्या आयुष्यात असतो. पैशाशिवाय जगू शकत नाही. श्वासा इतकीच किंमत पैशाला आहे. उदाः- एक माणूस रोज चोरी करायचा. त्याची बायको मुलांना खाऊ घालायची. एक दिवस तो चोरी करताना पकडल्या गेला. बायकोला पोलीसांनी विचारले की, हा चोरी का करतो? त्याची बायको म्हणाली, माझ्या मुलांच पोट भरत. चोरी करून पैसे मिळवणे पापच आहे. जास्त पैसा असला की, आपल्या हातून चोरी, वासना, व्यसन असली पापे घडतात. जेथे पाप आहे तेथे काल राहतो आणि जीवाचे हाल होतात. पाप शोधायला दुसरीकडे जायची गरज नाही. पाप प्रत्येक व्यक्तीला दोषी आणि देवाच्या क्रोधास पात्र बनवते. छल, कपट, लोभ असेल तेथे पाप घडते. तुझ्यात स्वच्छ निर्मळपणा असेल तर गुरुदेव तुझी माळ नक्कीच स्विकारतील.
शान-शौकिनी नाही म्हणुनी, मित्र न जमती कोणी ।
एकटाच मग राहसी पडुनी, उदासलेल्या वाणी ।
घेऊनी प्रभू भक्तीची ढाल, तोडी भवतापाचे ताल ।।३।।
तु शान- शौकाने राहत नाही म्हणून मित्र तुझ्या भोवती जमताना दिसत नाही. चांगले मित्र विश्वास, सहानुभूती, समर्थन, निष्ठा, आदर या सारख्या गुणांना मूर्त रुप देते. मजबूत मैत्री निर्माण करण्याकरिता दयाळूपणाची आवश्यकता आहे. मित्राजवळ भरपूर पैसा असेल तर व्यसनी मित्र जमतात. धार्मिक प्रवृत्ती असेल तर मित्र मुळीच जमत नाही. तेव्हा तुला एकट्याला उदासलेपणाने राहावे लागते. ईश्वराच्या भक्तीची ढाल हाती घ्यावी म्हणजेच नामस्मरण, ध्यान, चिंतन व संत समागम घडेल. नामस्मरणाने परमशांती मिळते. प्रभू भक्ती म्हणजे परमात्म्याला शरण जाणे होय. नामस्मरण केल्याने भवतापाचे बंधन तुटते. गुरुकृपेनेच भवतापाचे हरण होते. गुरुकृपा होता देह देवतुल्य झाला, भवताप अंतरीचा सोडूनिया गेला.
जिवनाचे काटे उचलोनी, शांती-सुखाने राही ।
आत्म्याचा मग सर्वाभूति, अनुभव तुजला येई ।
तुकड्यादास म्हणे हो लाल, होशिल गुरुदेवाचा बाल ।।४।।
संसार दुःखमय, काटेरी आहे. दुःखमय काटे नाहीसे व्हावे असे वाटत असेल तर ईश्वराला आपलेसे करा व नामाची कास धर. जीवन हे क्षणभंगूर आहे. जीवन जगण्यासाठी सकारात्मक उर्जेचा विचार असणे आवश्यक आहे. जीवन घडविण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत. जीवनात काटे आहे म्हणजे जीवन दुःखाने भरलेले आहे. जसे गुलाबाला काटे असतात. गुलाब तोडतांना काटा हाताला रुतल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनातील काटे उचलून शांती सुखाने राहावे. शांतीपरते सुख व शांती हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. सुख आले की त्याच्या पाठोपाठ दुःख येणारच. शांती अशांती या मनाच्या सापेक्ष अवस्था आहेत. आत्म्याचा सर्वाभूती अनुभव घेण्यासाठी आपल्या शरीराचा आणि इंद्रियाचा सहारा घ्यावा लागतो. आध्यात्मिक अनुभव हे फक्त गुरुदेवच देतात. राष्ट्रसंत शेवटी म्हणतात की, हो लाल. मग तू गुरुदेवाचा बाल होशिल. आपल्या सभोवताली लाल ज्वालांनी पेट घेतला आहे. तु निर्मळ हो. हे जग ईश्वरच आहे. गुरुदेवाला आपला शिष्य बालकासमान वाटत असतो म्हणून गुरुदेव शिष्याला आध्यात्मिक अनुभव शिकवित असतात. तु पवित्र मनाने गुरुदेवाला तुझी एकट्याची माळ अर्पण कर.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....