कारंजा-सगळे आपली साथ सोडून जातील परंतु आपली सावली आपली साथ सोडत नाही असे अनेक जण म्हणतात परंतु ही गोष्ट आज वाशिम जिल्ह्यासाठी खोटी ठरली आहे. कारण काही क्षणासाठी का होईना परंतु वाशिम जिल्ह्यातील वस्तूंची व व्यक्तींची सावली चक्क अदृश्य झाली.आज कारंजेकरांनी व जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी सावली हरवल्याचा अनुभव घेतला.एरव्ही सावलीकडे कुणी निरखून पाहत नाही. मात्र, उन वाढायला लागले की उन आणि सावल्यांचा खेळ नागरिक अनुभवतात.तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तसे दैनंदिन जीवनातील सावलीचे महत्त्व कमी होत गेले. सध्या याची चर्चा होते ती शाळेत शिक्षण घेताना आणि शून्य सावली दिवसाच्यावेळी. सावलीचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे व सावलीबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने भारतीय खगोल मंडळाने(ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया) "झीरो शॅडो डे" नावाचे अॅप लाँच केले आहे.रोज दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली नाहीशी होते,असा अनेकांचा समज आहे.मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. अशी स्थिती काही ठरवीक दिवसांमध्येच निर्माण होते. यासाठी विविध खगोलीय गणितं जुळवून त्या तारखा ठरविल्या जातात. याबद्दल भारतीय खगोल मंडळ गेल्या काही वर्षांपासून देशपातळीवर जनजागृती मोहिम राबवत आहे.
कारंजातील खगोलप्रेमी गोपाल खाडे हे गेले अनेक वर्षांपासुन जि.प. विद्यालय कामरगांव व बाबरे कॉलनीत जनजागृती करत आहे.गोपाल खाडे यांनी आपल्या घरी अंगणात विशिष्ट पद्धतीने साहित्याची मांडणी करुन सावली अदृश्य होत नाही तर ती त्या वस्तूच्या खाली गेल्याने दिसत नाही. गोपाल खाडे यांनी काचेवर या वस्तू ठेवल्या त्यामुळे त्या वस्तूंची सावली काचेच्या खाली पडलेली दिसली.
शून्य सावलीचा दिवस म्हणजे काय?
ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावाच्या अक्षांशाएव्हढी होते, त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावली आपल्या पायाखाली येते व अदृश्य होते. या दिवसाला "शून्य सावलीचा दिवस"असे म्हणतात. आज कारंजात गोपाल खाडे, अशोकराव ताथोड,प्रा. किशोर वानखडे, निलेश राऊत, कौस्तुभ ताथोड,कनिष्का कडु,समर्थ कडु यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला. झेड एस डी ॲप घेवुन खगोल प्रेमी याचा आनंद व माहिती घेऊ शकतात अशी माहिती गोपाल खाडे यांनी दिली.
मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड व पर्यवेक्षक गोपाल खाडे यांचे मार्गदर्शनात जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या अनेक विद्यार्थ्यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला.