चंद्रपूर, दि. 14 जून : खरीप हंगामाला सुरवात झाली असून पीक लागवड, बी- बियाणे व खतांची खरेदी तसेच इतर गरजा पूर्ण करण्यासाठी शेतक-यांना आता पैशांची गरज आहे. हा हंगाम शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने आणि जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, म्हणून जिल्ह्यात 16 ते 22 जून या कालावधीत पीक कर्ज वाटप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभर विशेष मेळावे घेऊन शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमीत केले आहे.
पीक कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना शेती खर्च, पीक लागवड, तसेच इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला गती मिळावी, कोणताही शेतकरी वंचित राहु नये, या उद्देशाने खरीप हंगाम - 2025 करिता शेतकऱ्यांना बँका आणि संलग्न विभागाच्या समन्वयाने पीक कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या संकल्पनेतून 16 ते 22 जून या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेत सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बँकेचे शाखा व्यवस्थापक, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), तालुका पशुसंवर्धन अधिकारी, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आदींनी अचुक व परिणामकारक नियोजन करावे. तसेच प्रत्येक बँकेच्या शाखेत 16 ते 22 जून या सप्ताहात दररोज सकाळी 11 ते सायं. 4 या वेळेत कर्ज वाटप मेळावे आयोजित करावे, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
या कॅम्पचे पर्यवेक्षण करण्याकरिता तहसीलदारांनी तालुक्यातील महसुल, कृषी, ग्राम विकास आणि सहकार विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचा-यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणुक करावी. नोडल अधिका-यांनी सप्ताहाच्या कालावधीत दररोज किमान 3 तास नेमून दिलेल्या बँक शाखेला भेट द्यावी. पीक कर्ज वाटपाच्या मेळाव्यात सहभागी होऊन 100 टक्के शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप होईल, असे पाहावे. तसेच कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्ज वाटप मेळाव्यात खालील बाबींचा अंतर्भाव करावा : 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्ज अर्जाची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे, 2. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना याची पूर्वकल्पना देऊन त्यांचा सहभाग वाढवावा, 3. सर्व बँक शाखांनी कर्ज प्रस्तावांची छाननी व मंजुरी प्रक्रियेसाठी तयारी ठेवून मेळाव्यात कर्जाचे वितरण करावे, 4. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी कुक्कुटपालन व्यवसायात खेळतं भांडवली कर्ज सर्व बँकामार्फत उपलब्ध आहेत, याची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, 5. शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक पोर्टलवर फार्मर आयडी करून देण्यात यावे.
पीक कर्जाकरिता लागणारी कागदपत्रे : 1. आधारकार्ड, 2. पॅन कार्ड, 3. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, 4. बँक पासबुकची प्रत, 5. 7/12 उतारा, 6. नमुना 8अ, 7. कर्ज नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र.
उपरोक्तप्रमाणे कागदपत्रे शेतकऱ्यांनी सदर मेळाव्यात सोबत आणण्यासाठी महसुल, ग्राम विकास, सहकार आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी याबाबतची प्रचार प्रसिध्दी करावी. वरील नियोजन यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व बैंक प्रतिनिधींनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी. तसेच या मेळाव्याच्या फलनिष्पत्तीबाबत प्रत्येक बँक शाखा व्यवस्थापकाने पीक कर्ज वाटपाचा दैनंदिन अहवाल संबंधित तहसीलदारांना तसेच अहवालाची एक प्रत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बैंक ऑफ इंडीया, चंद्रपूर यांच्याकडे संकलनासाठी सादर करावा, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
00000000
आपल्या प्रतिक्रिया द्या....