सिंदेवाही येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चौघांना पोलिसांनी ब्रह्मपुरीतून अटक केली. सरला दौलत राखडे (६५), शिल्पा रोहित सौदागर (४०), संगीता जयसिंग राखडे (४७), शुभम शंकर चांदेकर (२७) रा. चिखली जि. वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील मुरादपूर येथील कविता चंद्रकांत कटुलवार (33) ही महिला सिंदेवाही बसस्थानकावर पती व आपल्या नातेवाइकांसह गावाकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. दरम्यान, ब्रह्मपुरीहून चंद्रपूरला जाणारी एक बस आली. कविता कटुलवार या बसमध्येगर्दीतून चढत असताना खाली उतरत असलेल्या अज्ञात प्रवाशाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. चोरीचा प्रकार लक्षात येताच कविता
कटुलवार हिने सिंदेवाही पोलिसात तक्रार केली.
तेव्हापासून पोलिस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान ब्रह्मपुरीत तीन महिलांसह एक संशयित व्यक्ती कारमध्ये फिरत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सिंदेवाही येथील बसस्थानकावरील एक महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपी सरला राखडे,
शिल्पा सौदागर, संगीता राखडे व शुभम चांदेकर या चौघांना अटक केली.आरोपींकडून मंगळसूत्र क चोरीसाठी वापरलेली एमएच ४० आर २२०५ क्रमाकांची कार असा एकूण ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर मुद्देमालासह सर्व आरोपींना सिंदेवाही पोलिसांकडे स्वाधीन केले.