वाशिम / कारंजा : आधुनिक विज्ञानयुगातही पारंपारिक लोककला जीवंत ठेवून, आपल्या पारंपारिक लोककलेद्वारे महाराष्ट्रामध्ये शासकिय कार्यक्रमाची जनजागृती करीत समाज प्रबोधन करणार्या लोककलावंताना शासनाकडून अत्यल्प म्हणजेच गगनाला भिडलेल्या महागाईच्या मानाने अतिशय तुटपूंजे मानधन दिले जाते. शासनाच्या कर्मचार्याकरीता शासन दर दहा वर्षांनी वेतन आयोग गठीत करते. शिवाय शासकिय कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मात्र तळागाळातील, ग्रामीण भागातील, दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या हाडाच्या लोककलावंताचा मात्र विचारच केला जात नाही . ही दुदैवी बाब असून विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने, वाढत्या महागाईला अनुसरून लोककलावंताच्या मानधनात वाढ करून त्यांना दिपावली पूर्वी कमित कमी दरमहा पाच हजार रुपये मानधन जाहीर करण्याची आणि माहे ऑगष्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तिन महिन्याचे मानधन दिपावली पूर्वी देण्याची मागणी जिल्ह्यातील अग्रणी असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, मानोरा तालुकाध्यक्ष लोमेश पाटील चौधरी, लोककलावंत हभप अजाब महाराज ढळे,उमेश अनासाने , कांताबाई लोखंडे, इंदिरा बाई मात्रे, शेषराव पाटील इंगोले इ नी मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेन्द्रजी फडणवीस, राज्यपाल महोदय,सांस्कृतिकमंत्री ना सुधिरजी मुनगंटीवार यांचेकडे केलेली असून वाशिम जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील इतर संस्थानी सुद्धा आपल्या मागणीला पाठींबा देऊन शासनाकडे मानधन वाढविण्याची मागणी लावून धरावी आणि लोकप्रतिनिधी (आमदार) यांनी विधानसभेत आमच्या मागणी करीता प्रस्ताव पारीत करावा. असी विनंती सुद्धा विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.