कारंजा : येथून जवळच असलेल्या दारव्हा मार्गावरील, सोमठाना या छोट्याशा खेड्यात राहणारे दाम्पत्य म्हणजेच, सौ तुळसाबाई मधुकरराव गावंडे (वय : ६५ वर्षे) व मधुकर विठोबा गावंडे (पाटील) ( वय : ७२ वर्षे ) हे दाम्पत्य आज म्हातारपणातील विविध आजार व व्याधींनी ग्रस्त आहेत . वृद्धापकाळामुळे त्यांचेकडून कामधंदा होणे शक्य होत नाही . त्यातच विविध आजार वेळोवेळी डोके वर काढीत असतात . त्यामुळे आज ते कुणी म्हातारपणी त्यांना जिव्हाळा लावून मायेचा आसरा देईल का ? याची प्रतिक्षा करीत असतांना त्यांना शनिवारी दि ५ नोहेंबर रोजी "एक ऊब जाणिवेची " या संस्थेने त्यांची व्यथा जाणून घेऊन, दिपावली निमित्त नविन कपडे व महिनाभराचे किराणा सामान देऊन दत्तक घेतले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, अंदाजे २० वर्षापूर्वी वापी गुजरात येथे, रोजमजुरी - कामधंद्याकरीता गेलेल्या त्यांच्या मुलांचे स्वयंपाकाच्या गॅस दुर्घटनेत अपघाती निधन झाले होते. त्यामध्ये वयोवृद्ध दाम्पत्याची दोन मुले ज्ञानेश्वर मधुकर गावंडे, सुनबाई सौ शारदा गावंडे, चिमुकली नात कु मोहना ज्ञानेश्वर गावंडे, विहीनबाई विमलाबाई वाघ तसेच लहान मुलगा सोपान मधुकर गावंडे यांचे दुःखद निधन झाले होते . तर याचा प्राणांतिक धक्का लागून विवाहीत मुलीचे मुक्ताबाईचे सुद्धा निधन झाले होते. त्यामुळे कुनबी पाटील समाजातील दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मधुकर गावंडे तथा तुळसाबाई गावंडे ह्या पूर्णतः निराधार झाल्या होत्या. ही दुःखद माहिती समाजसेवक संजय कडोळे यांनी किशोर धाकतोड गुरुजी यांना दिली. व त्यांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता, अखंड मानवसेवेचे व्रत घेतलेल्या "एक ऊब जाणिवेची" या सेवाभावी संस्थेला दिली. आणि लगेच संस्थेने दखल घेऊन मधुकर गावंडे (पाटील) आणि सौ तुळसाबाई गावंडे (पाटील) या वयोवृद्ध कुटूंबाची भेट घेऊन, त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न म्हणून त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन लगेच कपडे व महिनाभर्याचा किराणा दिला. या जगात दुःखितांची सुद्धा माहिती मिळायला हवी. म्हणजे त्यांचे अश्रू टिपून मायेचा आसरा देण्याकरीता समाजातील मानवसेवी एक ऊब जाणीवेची सारखी संस्था पुढे येते हेच या गोष्टीवरून सिद्ध होत आहे .