गेल्या पाच वर्षापासून सातत्याने "विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा" ही कलावंताची अग्रणी संस्था, शासकीय निमशासकिय समित्याच्या आणि जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीच्या गठनाची कायदेशीर मागणी करीत असतांना आणि मागील महिन्यात,बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी विदर्भ लोककलावंत संघटनेने,जिल्हयातील शेकडो कलावंताचे विराट असे "क्रांतिकारी धरणे आंदोलन" केले असतांना सुद्धा शासनाने अद्याप पर्यंत निवड समितीचे गठन केलेले नाही.असे वास्तव असतांना दुसरीकडे मात्र जिल्हयातील एका समाजाच्या कलाकाराची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची जोरात स्वयंघोषीत चर्चा असून,ह्या व्यक्तीचा त्यांच्या मित्रमंडळी कडून जोरात प्रचार प्रसार सुरु आहे.शिवाय भजनीमंडळीना मानधनाचे नविन प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तसेच इच्छुक लाभार्थ्यांकडून माया गोळा करण्यात येत असल्याची सर्वदूर चर्चा आहे.त्यामुळे काही कलावंताच्या विदर्भ लोककलावंत संघटनेकडे तक्रारी येत आहेत.या अनुषंगाने विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले की, "शासनाने वरिष्ठांच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी यांच्याच अध्यक्षतेखाली निवड समितीचे गठन करून गेल्या पाच वर्षातील लोककलावंताचे प्रलंबीत अर्ज शासकिय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना अविलंब मानधन मंजूर करावे. इच्छुक लाभार्थ्याचे जुने अर्ज निकाली निघाल्या शिवाय नविन अर्ज स्विकारू नये.तसेच मानधन योजनेत कोणताही भ्रष्टाचार होणार नाही.याची काळजी घेण्याची विनंती करणारे निवेदन संस्थेकडून, दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी महोदया आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन देण्यात येणार असून, "मानधन मंजूरी करीता लोककलावंतानी थेट शासकीय अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांशीच संपर्क साधावा.त्याकरीता बाहेरच्या कोणत्याही दलाल किंवा एजंट व्यक्ती सोबत आर्थिक व्यवहार करू नये.आणि कुणी लोककलावंताना पैशाची मागणी केली.तर सापळा रचून त्यांची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय वाशिम किंवा अमरावती यांचेकडे करावी. व भ्रष्टाचारी व्यक्तींना अटक करण्यास मदत करावी." असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कलावंताना केले आहे.