वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी व पदवीनंतरच्या विविध स्तरावरील व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरू केली आहे.
या योजनेच्या पात्रतेसंबंधी निकष - विद्यार्थी हा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. या योजनेसाठी निवड करतांना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी वाशिम शहर नगरपरिषद क्षेत्रामधील मविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थी स्थानिक रहीवासी नसावा. वाशिम शहर नगरपालिकेच्या हद्दीच्या परिसरातील रहिवासी नसावा. इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी/पदवीका अभ्यासक्रमात किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/पदवीका व्यावसायीक/ बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला प्रवेशित असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान 2 वर्षे असावा.दिव्यांगासाठी गुणवत्तेची टक्केवारी किमान 40 टक्के इतकी राहील.
तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतू प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता 29 मार्च 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.