कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): महाराष्ट्रातील प्रामुख्याने अंधश्रध्दा आणि व्यसन निर्मुलनावर समाजप्रबोधन करणारे मानवतावादी सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोलिकर हे मुळचे पश्चिम विदर्भातील,अमरावती विभागातील,अकोला जिल्ह्यात येणाऱ्या अकोट तालुक्यातील ग्राम सिरसोली येथील बहुजन समाजातील असून,त्यांचे संपूर्ण नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोलीकर वय वर्षे 71.त्यांच्या जीवन चारित्र्यावर राष्टसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जीवनाचा ठसा उमटला असल्याचे दिसून येते.गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव सेवाश्रमाचे आजिवन प्रचारक असलेल्या सत्यपाल महाराजांनी आपल्या सप्तखंजेरी किर्तनातून,सरळ आणि साध्या अस्सल ग्रामिण भाषेमधून ग्रामस्वच्छता,चारित्र्य स्वच्छतेचा प्रचार प्रसार करतांना,अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्ती करीत असतांना 52 वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाडी 17000 पेक्षा जास्त गावात सप्तखंजेरी किर्तन केली आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार,डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार,समाज प्रबोधनकार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित केलेले असून सध्या झी टॉकीज वाहिनीवर दि. 24 ऑगष्ट ते 26 आगष्ट पर्यंत सलग तिन दिवस त्यांचा अस्सल साध्या भोळ्या ग्रामिण भाषेतून किर्तन सुरू असून,महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील करोडो रसिक श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांचे कारंजा येथील शिष्य,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडाळे यांनी दिली आहे